लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील एका जर्दा दुकानासह अन्य एका दुकानावर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, या कारवाई अंतर्गत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़मुंबई येथील एका सेवाभावी संस्थेने जिल्हा पोलीस प्रशासनाकडे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक तंबाखूजन्य पदार्थ परभणीत विक्री होत असल्याची तक्रार केली होती़ या तक्रारीच्या आधारावर सोमवारी दुपारच्या सुमारास सहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्टेशन रोड परिसरातील दुकानांवर जावून साठवलेल्या मालाची तपासणी केली़ तेव्हा विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला हा माल आढळून आला़ आरोग्य संस्थांच्या निर्देशाप्रमाणे तंबाखूजन्य पदार्थांवर आरोग्यास हानीकारक असल्याचा इशारा देणारा मजकूर प्रकाशित करणे आवश्यक आहे; परंतु, हा मजकूर न छापताच तंबाखूजन्य पदार्थ बाजारात विक्री होत असल्याचे निदर्शनास आले़ या संदर्भात पोलिसांनी काही पदार्थ ताब्यात घेतले आहेत़ नानलपेठ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या संदर्भात कुठलाही गुन्हा नोंद झाला नव्हता़ अशाच पद्धतीने नवा मोंढा भागातील अन्य एका दुकानावरही पोलिसांची सोमवारी कारवाई केली आहे़ या कारवाईतही जप्त केलेल्या साठ्याची मोजदाद करून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली़ पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे़
परभणीत पोलिसांची मोठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:57 PM