पालम (परभणी ) : तालुक्यातील कोनेरवाडी येथे शहीद जवान शुभम मुस्तापुरेवर आज सकाळी अकरा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोनेरवाडीकरांनासह उपस्थित हजारो नागरिकांना गहिवरून आले. वीरपुत्र गमावल्याचे दुःख तर देशासाठी बलीदान देणाऱ्या पुत्राचा अभिमान असे भाव यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते.
तालुक्यातील कोनेरवाडी येथील शहीद जवान शुभम सूर्यकांत मुस्तापूरे यांना 3 एप्रिलला सकाळी कृष्ण घाटी नियंत्रण रेषेजवळ कर्तव्य बजावताना पाकच्या गोळीबारात वीरमरण आले. ही वार्ता त्याच दिवशी दुपारच्या सुमारास कोनेरवाडीत पोहचताच गावावर शोककळा पसरली आहे. काल बुधवारी त्यांचे पार्थिव औरंगाबाद येथे रात्री उशिरा आले.
आज पहाटे ५ वाजता त्यांचे पार्थिव कोनेरवाडीत आणण्यात आले. चाटोरीतील विवेकानंद विद्यालयात काही वेळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यानंतर सकाळी सात वाजता चाटोरीतून पार्थिव देशभक्तीपर गीतांच्या गजरात कोनेरवाडीत नेण्यात आले. गावात अंत्यदर्शन घेतल्यानंतर काही वेळ पार्थिव बाहेरगावाहून आलेल्या नातलग, राजकीय मंडळींनी त्यांना अंत्यविधीच्या ठिकाणी श्रद्धांजली वाहीली. त्यानंतर चबुत-यावर धार्मिक विधी पुर्ण करून तोफाची सलामी देत अंतीम निरोप देण्यात आला आहे.
यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आ. डाॅ. मदुसूधन केंद्रे, आ. डाॅ. राहूल पाटील, माजी खा. सुरेश जाधव, जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर, उपजिल्हाधिकारी सुचित्रा शिंदे, अप्पर पोलिस अधिक्षक विश्व पानसरे, तहसीलदार तेजस्विनी जाधव, नायब तहसीलदार श्रीरंग कदम, पोलिस निरीक्षक महेश शर्मा, श्रीधर तरडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, गंगाप्रसाद आनेराव, संतोष मुरकुटे, गणेशराव रोकडे, वसंतराव सिरस्कर, बाबासाहेब जामगे आदींसह हजारोंचा जनसमुदाय येथे उपस्थित होता.