स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक आहे. मागील काही वर्षात केंद्र सरकारने वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना निधी देताना महत्त्व दिले आहे. निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात वितरीत करण्यात येत असल्याने गावपातळीवर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कोविडमुळे मागील ७-८ महिन्यांपासून निवडणुका रखडल्या होत्या. याकाळात ग्रामपंचायतीवर प्रशासकही नेमण्यात आले होते. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारकडून १५व्या वित्त आयोगअंतर्गत ग्रामपंचायतीच्या खात्यात थेट निधी वर्ग करण्यात आला आहे. यावेळेस १५व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करताना अनेक नवीन नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. तसेच धनादेशाने व्यवहार करण्यात आल्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी लागला. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झालेला निधी अद्याप खर्च करण्यात आला नाही. तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी रोजी होत आहेत. त्यातील ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ३८ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. गावागावात पार्ट्याना ऊत आला आहे. दारूचे बॉक्स रिचविले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यातील बाभळगाव, हदगाव, कासापुरी, कानसूर, उमरा, लिंबा, गुंज खु या प्रमुख गावातील निवडणुकीत तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या पुढाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यातच ग्रामपंचायतींच्या खात्यावर असलेल्या ३ कोटी ९४ लाख १४ हजार रुपयांच्या निधीवरही या पुढाऱ्यांचा डोळा आहे.
दोन टप्प्यात आलेला निधी
१५व्या वित्त आयोगाच्या निधीतून तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींना दोन टप्प्यात ३ कोटी ९४ लाख १४ हजार रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. अद्याप एकाही ग्रामपंचायतीचा निधी खर्च करण्यात आला नाही. त्यामुळे नवीन निवडून येणाऱ्या मंडळींना ग्रामपंचायत स्तरावर सत्ता मिळवल्यानंतर विकासकामासाठी तातडीने निधी खर्च करता येणार आहे.