परभणी : जिल्ह्यात ९०७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली असून, त्यात ६६१ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, त्या तुलनेत केवळ २४६ पुरुष कर्मचाऱ्यांनीच लस घेतली आहे. त्यामुळे कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी ही लस घेण्यासाठी पुरुष कर्मचारी फारसे पुढे येत नसल्याची बाब आतापर्यंत झालेल्या लसीकरणाच्या टप्प्यांवरून स्पष्ट होत आहे.
कोरोनाच्या महाभयंकर आजारामुळे जिल्ह्यात मागील वर्षातील सात- आठ महिने नागरिकांनी भीतीच्या सावटाखाली घालवले. या आजारावर लवकर लस उपलब्ध व्हावी, अशी त्यावेळी प्रतीक्षा केली जात असे. जिल्ह्यात १५ जानेवारी रोजीच ही लस उपलब्ध झाली. शासनाच्या निर्देशानुसार सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यातील चार केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे दररोज ४०० कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यानुसार १६ जानेवारी रोजी पहिल्याच दिवशी या लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभरात ४०० पैकी ३९४ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. मात्र, त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना थंडी वाजणे, ताप येणे अशी लक्षणे दिसू लागल्याने दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १९ जानेवारी रोजी ४०० पैकी २२९ आणि २० जानेवारी रोजी २८४ कर्मचाऱ्यांनी कोरोना लस घेतली आहे.
विशेष म्हणजे, लसीकरण करून घेण्यासाठी पुरुष कर्मचारीच मागे राहत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. २० जानेवारी रोजी पार पडलेल्या लसीकरणात जिल्हा रुग्णालयाच्या केंद्रावर २४ पुरुष आणि ७ महिलांनी लसीकरण करून घेतले. सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात १११ महिला कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले. मात्र, एकाही पुरुष कर्मचाऱ्याने लस घेतली नाही. जांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७३ महिलांनी लसीकरण करून घेतले तर केवळ एका पुरुष कर्मचाऱ्याने या ठिकाणी लस घेतली. महापालिकेच्या जायकवाडी केंद्रावरही ६८ महिलांना लसीकरण झाले. तर पुरुषांची संख्या केवळ १५ होती. त्यामुळे लसीकरणासाठी पुरुष कर्मचारी पुढे येत नाहीत का? असा प्रश्न यानिमित्ताने होत आहे.
संभ्रम न ठेवता लसीकरण करून घ्यावे
जिल्ह्यात पहिल्या दिवशी लसीकरण केल्यानंतर काही कर्मचाऱ्यांना थंडी वाजून येणे, ताप येणे अशी लक्षणे आढळली. त्यामुळे लस घ्यावी की नाही, अशी द्विधा मन:स्थिती काही कर्मचाऱ्यांमध्ये आहे. मात्र, कोणतीही लस घेतल्यानंतर थंडी वाजून येणे, ताप येणे अशी लक्षणे जाणवतातच. शासनाने उपलब्ध करून दिलेली लस पूर्णत: सुरक्षित आहे. जाणवणारी लक्षणे साइड इफेक्ट नाहीत. त्यामुळे न घाबरता लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.