चारठाणा : जिंतूर तालुक्यातील कवडा शिवारात १७ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे बिबट्याचा शोध घेणाऱ्या पथकाला अद्यापही यश आले नसल्याने कवडासह वाघी धानोरा, वडी या शिवारातील ग्रामस्थांच्या मनातील भीती कायम आहे.
जिंतूर तालुक्यात ४ फेब्रुवारी रोजी एका कुत्रीचा आणि निल गायीची शिकार बिबट्याने केली होती. त्यामुळे या भागात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकारानंतर ग्रामस्थांनी वनविभागाला पत्र देऊन बिबट्याचा शोध घेण्याची मागणी केली होती. वनविभागाने थातूरमातूर कारवाई करीत या भागातून काढता पाय घेतला. त्यामुळे ग्रामस्थांत नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी वाघी धानोरा या गावाकडे जाणाऱ्या ग्रामस्थांच्या वाहनासमोर बिबट्या आला होता. या बिबट्याचा व्हिडिओ ग्रामस्थांनी तयार केला. हा व्हिडिओ समाज माध्यमातून फिरल्यानंतर वनविभागाने पुन्हा शोधमोहीम हाती घेतली. मात्र वनविभागाच्या पदरी निराशाच पडली. याचदरम्यान दि. १७ फेब्रुवारी रोजी कवडा येथील शेतकरी विनोद चव्हाण यांना बिबट्याचे दर्शन झाले. वनविभागालाही ही माहिती देण्यात आली आहे. जिंतूर तालुक्यातील भोसी शिवारातील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिलाला वनविभागाच्या पथकाने जीवदान दिले होते. त्यामुळे मादी बिबट्या या पिलाच्या शोधात फिरत असावी, अशी शक्यता ग्रामस्थ वर्तवित आहेत. मात्र अद्याप बिबट्या हाती लागला नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीती कायम आहे.
बोरगळवाडी-कावी शिवारात लावला पिंजरा
दरम्यान, या संदर्भात वनपाल गणेश घुगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, बोरगळवाडी- कावी गावाच्या शिवारात पिंजरा लावण्यात आला असून, वनपाल घुगे व त्यांचे सहकारी डी. जी. कोल्हेवाड, पांडुरंग वाघ, केशव राठोड आदी रात्रीच्या वेळी गस्त घालून शोध घेत आहेत.
तर जबाबदार कोण?
या भागात बिबट्याचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतरही वनविभागाने केवळ गस्त घालण्याची थातूरमातूर कारवाई करीत जनजागृती करून काढता पाय घेतला आहे. बिबट्या मात्र या भागात वावरतच आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल यानिमित्ताने ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.