परभणी : जिल्ह्यात कोविडच्या संसर्गकाळात स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या ३० अधिपरिचारिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याने या कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोविडचा संसर्ग वाढत असल्याने आरोग्यसेवा देण्यासाठी जिल्हा परिषदेने स्वतंत्र जाहिरात प्रकाशित करुन १२० अधिपरिचारिकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती दिलेल्या या कर्मचाऱ्यांची मुदत ८ ऑगस्ट रोजी संपल्यानंतर त्यांना परत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी दुसरी मुदतवाढ देण्यात आली. मात्र १ डिसेंबर रोजी मुदत संपल्यानंतर सर्व अधिपरिचारिकांना मुदतवाढ देण्याऐवजी केवळ ७० अधिपरिचारिकांनाच नियुक्ती आदेश देण्यात आले असून, ३० परिचारिकांना कामावरून कमी केले आहे. कामावरून कमी करताना या कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी बुधवारी संताप व्यक्त केला. कोरोनासारख्या गंभीर आणि संकटाच्या काळात आम्ही आमचा जीव धोक्यात घालून काम केले. मात्र, त्याची कोणतीही दखल न घेता प्रशासनाने आम्हाला अचानक कामावरून कमी केले. ‘गरज सरो वैद्य मरो’ अशातला हा प्रकार असून, प्रशासनाच्या या धोरणाविरुद्ध साखळी आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्य शासनानेच कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कर्मचारी कमी केले. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती कंत्राटी स्वरुपाची होती. त्यामुळे मुदत संपल्यानंतर त्यांची सेवा आपोआपच खंडित होते. त्यांना पूर्वसूचना देण्याची आवश्यकता नाही.
बी. पी. पृथ्वीराज, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., परभणी.