पाथरी (परभणी ) : तालुक्यात गंभीर दुष्काळ परिस्थिती असून मजुरांच्या हाताला काम नाही, मजुरांचे स्थलांतर होत आहे, काम मागून कामे उपलब्ध होत नाहीत, तालुक्यातील तीन गावातील 115 मजुरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काम मागणी केली आहे. मात्र, अद्याप कामे उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने दोन दिवसात यावर कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.
पाथरी तालुक्यात या वर्षी गंभीर दुष्काळ जाहीर झाला आहे, अशा परिस्थिती मजुरांच्या हाताला काम नाही, दुष्काळी योजनांची अंमलबजावणी होत नाही, मनरेगा ची कामे सुरू नाहीत, पंचायत समिती मार्फत केवळ सिंचन विहिरींची कामे सुरू आहेत, त्यासाठी विहीर खोदणारे मजुरच लागतात, इतर मजुरांच्या हाताला काम नसल्याने या भागातील मजुरांचे स्थलांतर वाढले आहे.
दरम्यान, सामाजिक वनीकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतेही कामे सुरू नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शेत रस्ताची कामे घेतली जातात, पाथरी तालुक्यात या विभागाकडे 6 कामांचा सेल्फ उपलब्ध आहे , असे असले तरी या विभागाकडून कामे हाती घेतली जात नाहीत हाताला काम उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तालुक्यातील रेणापूर -40 कासापुरी- 30 आणि बाभलगाव येथील 45 मजुरांनी केली.मात्र, त्यांना काम उपलब्ध झाले नाही. यामुळे तहसिलदारांनी याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम उपविभागास मंजुरांना कामे उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत.