कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला गुरुवारी व्हेंटीलेटर्सचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील कोरोना स्थिती आणि इतर आढावा घेण्याच्या उद्देशाने उदय सामंत हे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, महाविद्यालये सुरू करण्याच्या अनुषंगाने चाचपणी घेतली जात आहे. त्यानुसारच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची स्थिती लक्षात घेवून महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना येथील जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना संसर्ग लक्षात घेवून महाविद्यालये सुरू करण्यासाठी वेगवेगळी एसओपी ठरविली जाईल. रुग्णसंख्या कमी असल्यास महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी लसीचा राखीव कोटा ठेवावा, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण किती झाले आहे? याचा अहवाल घ्यावा, तसेच वर्ग खोल्याच्या निर्जतुकीकरण संदर्भात आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवूनच या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेस आ.डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधीक्षक जयंत मीना आदींची उपस्थिती होती.
कॉलेज सुरू करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 4:22 AM