मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस गायब झाला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पाऊस येईल अशी अपेक्षा होती. मंगळवारी पहाटेच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. परभणी तालुक्यातील २१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे मानवत तालुक्यामध्ये १६.३ मिमी पाऊस झाला आहे. या दोन्ही तालुक्यांत झालेल्या पावसामुळे कोवळ्या पिकांना जीवदान मिळाले आहे. हा पाऊस समाधानकारक नसला तरी दिलासा देणारा ठरत आहे. दरम्यान, गंगाखेड १.९, पाथरी ४.३, पूर्ण ०.७, पालम ०.४, सेलू २.५ आणि सोनपेठ तालुक्यात ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २५०.५ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत १३३ टक्के अधिक पाऊस झाला असला तरी पावसाच्या खंडामुळे पिके धोक्यात आहेत.