पूर्णा (परभणी) : लग्नात आयुष्यभर साथ देण्याचे एकमेकांना वचन देणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याने सहा महिन्यातच टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपविल्याची घटना रविवारी सकाळी तालुक्यातील कातनेश्वर येथे उघडकीस आली आहे. गंगाधर विश्वनाथ चापके (२५) आणि सपना गंगाधर चापके (२१) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. गंगाधर चापके आणि सपना चापके यांचा साधारणत: सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर हातावरची मेहंदी उतरण्यापूर्वीच अवघ्या काही महिन्यातच या दोघांनीही विष प्राशन करून मृत्यूला कवटाळल्याने गावात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कातनेश्वर येथील पोलीस पाटील ज्ञानोबा काटकर यांना एका ग्रामस्थाने फोन करून चापके यांच्या घरी काहीतरी अनुचित घडले आहे, अनेकवेळा आवाज देऊनही चापके दाम्पत्य दरवाजा उघडत नाहीत अशी माहिती दिली. गंगाधर (२५) आणि सपना गंगाधर चापके (२१) या दाम्पत्याचा सहा महिन्यांपूर्वीचा विवाह झाला होता. सर्वकाही सुरळीत सुरु असताना अचानक असा फोन आल्याने पोलीस पाटील व ग्रामस्थांनी लागलीच चापके यांच्या घरी धाव घेतली. घराचा दरवाजा उघडला असता गंगाधर जमिनीवर तर सपना पलंगावर मृतावस्थेत पडल्याचे आढळून आल्याने ग्रामस्थांना धक्काच बसला. दोघांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे दिसून येत होते. त्यानंतर पूर्णा पोलीस ठाण्याला घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले, कर्मचारी घाटे, जमादार रणखांब यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दरम्यान, ९ जानेवारी रोजी कात्नेश्वर येथे एकाच सरणावर दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पूर्णा तालुक्यात २ दिवसात तिघांची आत्महत्याशनिवारी पूर्णा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील शास्त्री नगर येथील ३८ वर्षीय तरुण राजू शंकर लहाने याने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. त्यांनतर रविवारी कात्नेश्वर येथील दाम्पत्याने आत्महत्या केली. पूर्णा तालुक्यात २ दिवसात तिघांनी आत्महत्या केल्याने चिंता व्यक्त होत आहे.