शहरात लसीकरणाचे प्रमाण जवळपास ३० टक्केसुध्दा पूर्ण झालेले नाही. यातच दररोज लसीकरणाबाबत नवनवीन प्रकार महापालिका हद्दीतील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात समोर येत आहेत. शुक्रवारी लसीकरणावेळी कर्मचारी गायब झाल्याचा प्रकार एका केंद्रावर घडला होता. तर शनिवारी कोविशिल्डचा दुसरा डोस ४५ च्या वरील नागरिकांना केवळ २ केंद्रांवर दिला गेला. रविवारी सुट्टी तर सोमवारी सुरळीत लसीकरण झाले. यानंतर मंगळवारी कोविशिल्डचा साठा संपल्याने केवळ कोव्हॅक्सिनचा डोस बुधवारी उपलब्ध होता. यामध्ये जायकवाडी, इनायत नगर येथे दुसरा डोस कोविशिल्डचे उपलब्ध होते. मात्र, अनेकांना पहिला तसेच बऱ्याच जणांना दुसरा डोस मिळणे गरजेचे होते. परंतु, केवळ कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस व पहिला डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असूनही नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली. यामुळे लसीकरणाची गती बुधवारी मंदावली होती. तर सध्या कोविशिल्डचा साठा राज्यस्तरावरून संपल्याने लस उपलब्ध नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे गुरुवारी शहर स्तरावर लसीकरण होईल का नाही, याची शंका आहे. झाले तरी केवळ कोव्हॅक्सिनचे डोस मिळतील, अशी शक्यता आहे.
लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 4:14 AM