जिंतूर (जि.परभणी) : नाशिकहून नांदेडकडे विदेशी मद्य घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना जिंतूर-परभणी मर्गावरील येसगाव पाटीजवळ १० जूनला पहाटेच्या सुमारास घडली. यात चालक गंभीर जखमी झाला असून ट्रकमधील दारू घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. इरशाद खान असे जखमी चालकाचे नाव आहे.
नाशिकहून नांदेडकडे ट्रक चालक इरशाद खान हा विदेशी मद्य घेऊन जिंतूर-परभणी रस्त्यावरून गुरुवारी जात असताना पहाटे तीन वाजेच्या सुमारास येसगाव पाटी जवळ येताच समोरून येणाऱ्या कंटेनरला वाचविण्याचा प्रयत्नात रस्त्याच्या कडेला मुरूम असल्याने घसरून पलटी झाला. ट्रकमधील दारूचे शेकडो बॉक्स रस्त्यावर पडले. दरम्यान, सकाळच्या वेळेला जाणाऱ्या दुचाकी चालकांसह इतर वाहनधारकांनी यावर डल्ला मारला. अनेकांनी मिळेल त्या पद्धतीने दारू नेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, सबंधित चालकाने काही दुचाकीस्वारांकडून दारूचे बॉक्स हस्तगत केले. घटनेची माहिती जिंतूर पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकचा चालक इरशाद खान यांनी तक्रार दिल्यावरून पोलिसांनी या ठिकाणी पोलिस बंदोबस्त पाठवला. यासंदर्भामध्ये जिंतूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.