परभणी- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत २६ फेब्रुवारी पर्यंत जिल्ह्यातील १ लाख ६७ हजार १९६ शेतकरी कुटुंबांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात या योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंबांची संख्या १ लाख ७७ हजार ७८० एवढी आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळावे, या हेतुने केंद्र शासनाने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत प्रति शेतकरी कुटुंबाला तीन टप्प्यामध्ये ६ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार असून यातून बियाणे, खते, कृषी औजारे असे शेतीशी निगडित प्रश्न सुटणार आहेत. परभणी, सेलू आणि पाथरी तालुक्यातील पात्र शेतकरी कुटुंबांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. तसेच जिंतूर ९२.६४ टक्के, मानवत ९६.८५ टक्के, सोनपेठ ८६.४९, गंगाखेड ९२.८८, पालम ९३.६७ आणि पूर्णा तालुक्यातील ८३.९३ टक्के पात्र शेतकरी कुटुंबांची माहिती २६ फेब्रुवारीपर्यंत पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
ज्या कुटुंबांचे विविध ठिकाणचे मिळून २ हेक्टरपेक्षा कमी शेती आहे, अशा कुटुंबांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली असून पात्र खातेदाराचे नाव, लिंग, जातीचा प्रवर्ग, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड, आधार क्रमांक, ओळखपत्र, जन्म दिनांक आणि भ्रमणध्वनी क्रमांक आदी माहिती परिशिष्ट अ मध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सोसायटीचे सचिव या कर्मचाऱ्यांनी संकलित केली असून संबंधित तहसील कार्यालयातून ही माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
थेट लाभाची प्रक्रिया सुरुपरभणी जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या वतीने पहिल्या टप्प्यातील २ हजार रुपयांचा सन्मान निधी थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.