परभणी : राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून, कर्जमुक्ती झालेला एकही शेतकरी आतापर्यत आपणास भेटला नसल्याचा आरोप युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील एका कार्यक्रमात बोलताना केला़
शिवसेनेचे आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या जय भवानी महिला सहकारी सुतगिरणीच्या भूमीपूजन समारंभाचे व दुष्काळ निवारण संकल्प शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांशी संबंध नसलेल्या कंपन्यांना सरकारने पीक विम्याचे काम दिले आहे. या खाजगी कंपन्यांनी शेतकऱ्यांना पीक विम्याचा फारसा लाभ दिला नाही़ ज्यांना पीक विमा मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांच्या याद्या आमदार आणि खासदार यांच्याकडे द्या, शिवसेना त्याचा जाब विचारून या प्रश्नावर आंदोलन करेल, असे सांगत त्यांनी राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी किती शेतकऱ्यांना झाली, असा सवाल केला़ त्यावर उपस्थितीत शेतकऱ्यांनी कोणालाही कर्जमाफी मिळाली नसल्याचे सांगितले़. शेतकऱ्यांना कजमाफीचे प्रमाणपत्रे दिली जात आहेत़ परंतु, संबंधित शेतकऱ्यांचे कर्जच माफ केले जात नाही अशी टीकाही यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली .
यावेळी व्यासपीठावर खा़ बंडू जाधव,आ़ जयप्रकाश मुंदडा , जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ़ विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, गंगाप्रसाद आणेराव, सोपान आवचार, नंदू पाटील, समप्रिया पाटील, सदाशिव देशमुख, अंबिका डहाळे, सखूबाई लटपटे, गजानन काकडे, ज्ञानेश्वर पवार, अर्जुन सामाले आदींची उपस्थिती होती.
सौर उर्जेवर चालणारी एकमेव सुतगिरणी-पाटीलयावेळी बोलताना आ़ डॉ़ राहुल पाटील म्हणाले की, जय भवानी महिला सहकारी सुतगिरणी ही १०० टक्के सौर उर्जेवर चालणार असून, अशी ही महाराष्ट्रातील एकमेव सुतगिरणी ठरणार आहे़ या सुतगिरणीच्या माध्यमातून साडेतीन हजार महिलांना रोजगार मिळणार आहे. १०० टक्के समाजकारण याच भूमिकेतून शिवसेनेने आतापर्यंत काम केले असून, त्यासाठीच ही दुष्काळी संकल्प शिबीर आयोजित करण्यात आले आहे़ त्यामुळे दुष्काळात शेतकऱ्यांनी खचून न जाता व आत्महत्येचा मार्ग न अवलंबिता कुटूंबाचा विचार करून संकटांचा सामना करावा, शिवसेना त्यांच्यासोबत आहे़, असे सांगून त्यांनी शिवसेनेची बांधिलकी शेतकरी व सर्वसामान्यांशी आहे़ पोलीस भरतीसाठी शिवसेनेने १०० युवकांना दत्तक घेतले असून, मेगा भरतीसाठी युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचे कामही शिवसेनेकडून सुरू आहे़ गतवर्षीच आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात १ लाख लोकांची तपासणी करण्यात आली़ त्यातील १० हजार जणांवर मुंबईत विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या, असे ते म्हणाले़