सोनपेठ ( परभणी ) : अस्तित्त्वात नसलेली मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवून कर्ज उचलल्या प्रकार सोनपेठमध्ये समोर आला असून, या प्रकरणी कर्जदार, जामीनदारांसह बँकेचे अध्यक्ष, तत्कालीन ग्रामसेवक अशा ९ जणांविरुद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
पाथरी तालुक्यातील लिंबा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सय्यद पाशा सय्यद नजमोद्दीन यांनी सोनपेठ नागरी बँकेकडून पाच लाख रुपयांचे कर्ज कर्ज घेतले होते. या कर्जासाठी त्यांनी शेळगाव ग्रामपंचायत अंतर्गत मालमत्ता क्र.५४३ गहाण ठेवली होती. याच दरम्यान, बँकेचे कायदेशीर सल्लागार के.डी. मोकाशे यांनी या मालमत्तेचा सर्च रिपोर्ट तयार करुन २००५ ते २०१४ या काळात ही मालमत्ता अस्तित्त्वात असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर याच मालमत्ते ३० मार्च २०१८ मध्ये कर्जदारास आणखी कर्ज देण्यात आले.
दरम्यानच्या काळात एका व्यवहारात २०१७ मध्ये शेख पाशा सुलेमान यांनी विकत घेतलेली मालमत्ता क्र.३४३ भास्कर डुकरे यांनी विकत घेतली. तेव्हा बँकेकडे गहाण ठेवलेला मालमत्ता क्र.५४३ अस्तित्वातच नाही, ही बाब सोनपेठ नागरी बँकेच्या लक्षात आली. त्यामुळे बँकेचे कर्ज वसूल होणार नाही, याची कुणकुण लागल्याने बँकेने लिलाव प्रक्रियेची नोटीस काढली. या नोटिसीत मालमत्ता क्र.३४३ चा उल्लेख नमून असून, १२ नोव्हेंबर २०२० रोजी या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला. मात्र कायदेशीर अधिकार नसताना लिलाव केल्याने भास्कर डुकरे यांनी न्यायालयात धाव घेतली आणि या प्रकारणाला वाचा फुटली.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हा अर्ज दाखल झाला असताना न्यायालयाने कागदपत्रांची चौकशी केली. गुन्हा निष्पन्न होत असल्याने तो दाखल करावा, असे निर्देश पोलिसांना दिले. त्यावरुन अस्तित्त्वात नसलेली मालमत्ता सादर करणारे सय्यद पाशा सय्यद नजमोद्दीन, खोटा नमुना क्र.८ देणारे ग्रामसेवक अष्टुरे, उपसरपंच रफिक रज्जा कुरेशी, अस्तित्त्वात नसलेल्या मालमत्ता क्रमांकावर इमारत उभी करुन खोटा नकाशा देणारे अभियंता कल्याण पतंगे, सर्च रिपोर्ट देणारे ॲड.के.डी,मोकाशे, या सर्व प्रकरणात गहाणखत करुन घेणारे सोनपेठ नागरी सहकारी बँकेचे चेअरमन रमाकांत जहागिरदार, साक्षीदार युसूफ सुलतान अन्सारी, हबीब खान काशीम खान पठाण, शिवाजी रामभाऊ तळेकर यांनी खोट्या कागदपत्राअधारे कर्ज देऊन जनतेच्या पैशांचा अहपहार केल्याच्या आरोपावरुन सोपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने तपास करीत आहेत.