परभणी : नागरिकांनी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यास कडक लाॅकडाऊन लावले जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले असून, आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. त्याचप्रमाणे रुग्णांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात आरटीपीसीआरच्या तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत. मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र तरीही अनेकजण या नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सार्वजनिक ठिकाणची गर्दीही कमी झालेली नाही. त्याचप्रमाणे बाजारपेठ भागात फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. नागरिकांनी स्वयंशिस्तीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, मास्कचा वापर करावा अन्यथा लॉकडाऊन लावले जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिला आहे.