परभणी : उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस म्हटल्यावर प्रत्येकाला हापूसची आठवण येतेच. परंतु, सलग दुसऱ्या वर्षी वाढलेला कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे हापूसची आवक घटली आहे. यामुळे थोड्या उशिराने हा आंबा मागणीप्रमाणे शहरात दाखल होत आहे.
परभणी शहरात दरवर्षी रत्नागिरी आणि देवगड येथील हापूस आंबा विक्रीसाठी आणला जातो. तसेच सांगली येथून काही माल येतो. याशिवाय स्थानिक परभणी हापूससुद्धा मिळतो. उन्हाळ्याची सुरुवात होताच आंब्याची आवक होते. त्यात कोकणातील हापूसला अनेकांची पसंती असते. मार्चपासून हापूसची आवक जिल्ह्यात होत असते. यंदा आणि मागील वर्षी मार्चपासून कोरोनाचे रुग्ण वाढले. ही परिस्थिती यंदाही कायम असल्याने जिल्ह्यासह राज्यात लाॅकडाऊन लागले आहे. त्यामुळे दुकाने बंद तर माल येण्यास काहीसे निर्बंध लावल्याने नेहमीपेक्षा हापूसची आवक घटली आहे. त्यामुळे हापूसच्या चवीला परभणीकर मुकले आहेत.
असे आहेत यंदाचे दर
एक डझन - ६०० ते ७०० रुपये
पेटी - ३८०० रुपये (६ डझन)
मागील वर्षीचे दर
एक डझन - ५०० ते ६०० रुपये
पेटी - ३००० रुपये (६ डझन)
स्थानिक हापूसचीही विक्री
परभणी स्थानिक हापूस नावाने तयार होणारा आंबा बाजारात १५० रुपये डझनने मिळतो. त्याची विक्रीही चांगली होते.
१५ पेट्यांची दररोज विक्री
लाॅकडाऊनमुळे देवगड, रत्नागिरी येथील हापूस मागणीप्रमाणे दाखल होत आहे. सध्या १५ पेट्यांची दररोज विक्री होते. तूर्तास मागणी कमी आहे. अक्षयतृतीयेपासून जवळपास ४० टक्के लोक रस तसेच आंबा खाण्यास सुरुवात करतात. त्यानंतर ही मागणी अजून वाढेल.
- सतीश सातोनकर, विक्रेते.
अशी घ्यावी काळजी
हापूस आंबा खरेदी केल्यावर तो सुरुवातीला पेटीतून बाहेर काढावा. मग २ ते ३ दिवस पिकवावा. त्यानंतर त्याचा रस करावा.