पूर्णा ( परभणी) : थकीत पेन्शन व वाढीव डीए त्वरित देण्याच्या मागण्यांसाठी पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी बुधवारपासून ( दि. २४ ) धरणे आंदोलन करत आहेत. याची प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या कर्मचार्यांनी आज सकाळी १० वाजेच्या दरम्यान पालिका कार्यालयाला कुलूप ठोकले. तब्बल पाच तासानंतर पोलिसांच्या आश्वासनानंतर कुलूप काढण्यात आले.
पूर्णा पालिकेच्या विविध विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ५० पेक्षा जास्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे मासिक पेन्शन थकीत आहे. तसेच डीए ची वाढसुद्धा अद्याप मिळालेली नाही. परिणामी त्यांची व त्यांच्या कुटुंबांची आर्थिक ओढाताण होत आहे. यामुळे थकीत पेन्शन व डीए वाढ त्वरित मिळावी यासाठी ५० सेवानिवृत्त कर्मचारी बुधवारपासून ( दि. २४) पालिका परिसरात धरणे आंदोलन करत आहेत. मात्र, त्यांच्या आंदोलनाची दखल प्रशासनाने न घेतल्याने संतप्त कर्मचार्यांनी आज सकाळी पालिकेच्या मुख्याधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकले.
यावेळी पालिकेचे मोजकेच अधिकारी उपस्थित होते. या प्रकारानंतर पूर्णा पोलीस ठाण्याचे फौजदार गणेश राठोड हे घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी व नगर अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून या प्रकरणी तोडगा काढण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन दिले असता सुमारे पाच तासानंतर कार्यालयाचे कुलूप काढण्यात आले. मात्र, यानंतरही कर्मचार्यांचे धरणे आंदोलन सुरूच आहे.
आमरण उपोषणाचा इशारा आज सायंकाळपर्यंत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष हे कर्मचार्यांची भेट घेणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आंदोलनात एम.जे. नगरे, बी. बी.जैन, एम. एस. आरे, एम. डी. जोशी, श्रीराम कदम, लक्ष्मीबाई गवळी, लक्ष्मीबाई वावळे, शोभाबाई गायकवाड, लक्ष्मण कदम आदी सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी आहेत.