- अभिमन्यू कांबळे
परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात होणार असली तरी गेल्या आठ दिवसांपासून प्रमुख उमेदवारांच्या समर्थकांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रचारसभांपेक्षा सोशल मीडियातील वातावरण गरमागरम झाले आहे.परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी - कॉंग्रेस आघाडीकडून राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने अद्याप उमेदवारी जाहीर केली नसली तरी विद्यमान खा. बंडू जाधव हेच उमेदवार राहणार आहेत.
त्यामुळे सद्यस्थितीत तरी सरळ लढतीची चर्चा मतदारसंघात सुरु आहे. दुसरीकडे आघाडी व युतीच्या समर्थकांमधून सोशल मीडियावर जोरदार आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. आघाडीच्या वतीने गेल्या ३० वर्षात मतदारसंघ सेनेकडे असताना कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही. त्यामुळे आता विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघात इतिहास घडणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना-भाजपा युतीचे कार्यकर्ते मतदारांच्या अडीअडचणीत खा.बंडू जाधव हेच धावून येतात. त्यामुळेच ते मतदारसंघाचा विकास करु शकतात, असे प्रत्युत्तर दिले जात आहे. भाजपाचे कार्यकर्ते मात्र केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या निर्णयांची माहिती देणाऱ्या पोस्ट करीत आहेत. सोबत अनेक कार्यकर्त्यांनी स्वत:च्या नावासमोर ‘चौकीदार’म्हणून उपाधीही लावली आहे, तर कॉंग्रेसचे कार्यकर्ते ‘चौकीदार चोर है’ च्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत.
बोर्डीकरांचा निर्णय दोन दिवसांनंतरभाजपाचे माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी चालविली आहे; परंतु, राज्य स्तरावर शिवसेना- भाजपाची युती झाल्याने व परभणीची जागा शिवसेनेकडे असल्याने त्यांची गोची झाली आहे. त्यामुळे केलेली तयारी वाया कशी जाऊ द्यायची, या उद्देशाने समर्थकांशी चर्चा करण्यासाठी त्यांनी सोमवारी परभणीत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी दोन दिवसांत आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या बैठकीत शिवसेनेचे उमेदवार खा. बंडू जाधव व राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर या दोघांवरही जोरदार टीका करण्यात आली.