परभणी : ‘लोकमत’ने राज्यभरात सुरू केलेला महारक्तदान शिबिराचा उपक्रम गरजवंतांना रक्त देण्याबरोबरच रक्तदान चळवळीला बळ देणारा ठरत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले.
‘लोकमत’चे संस्थापक संपादक तथा स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त लोकमत आणि लायन्स क्लबच्या वतीने १३ जुलै रोजी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुगळीकर बोलत होते. कार्यक्रमास आ. मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, मनपा आयुक्त देवीदास पवार, प्रभारी शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, प्राचार्य बाळासाहेब जाधव, लॉयन्स क्लबचे डॉ. प्रवीण धाडवे, विक्की नारवानी, प्रदीप गोलेच्छा, ‘लोकमत’चे जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू कांबळे, शाखाधिकारी मोहन शिंदे आदींची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी मुगळीकर म्हणाले की, ‘लोकमत’ने नेहमीच सामाजिक उपक्रमात हिरिरीने सहभाग घेतला आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून पीडित, वंचितांना न्याय देण्याबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम ‘लोकमत’ने हाती घेतले. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरात आयोजित केलेले महारक्तदान शिबिर आहे. या शिबिराने रक्तदान चळवळीला बळ मिळाले आहे. राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन ‘लोकमत’ने राबविलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप करताना आ. मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, ‘लोकमत’च्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रमांना चालना दिली जाते. या रक्तदान चळवळीने जिल्ह्यातील थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांबरोबरच गरजवंत रुग्णांची गैरसोय दूर झाली आहे. प्रारंभी, ‘लोकमत’चे जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू कांबळे यांनी प्रास्ताविकात रक्तदान शिबिराची भूमिका विशद केली. लायन्सचे अरुण टाक यांनी सूत्रसंचालन केले. शाखाधिकारी मोहन शिंदे यांनी आभार मानले.
सकाळी ९ वाजेपासून सुरू झालेल्या या रक्तदान शिबिरास विविध पक्षांच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. त्यात आ.डॉ. राहुल पाटील यांनी रक्तदान शिबिरस्थळी भेट देऊन ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक केले, तसेच सकाळच्या सत्रात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक प्रकाश डाके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक डॉ. धर्मराज चव्हाण, प्रा. डॉ. विशाला पटनम, मनपाचे शिवसेनेचे गटनेते चंदू शिंदे आदींनी रक्तदान शिबिरस्थळी भेटी दिल्या. कार्यक्रमात जिल्हा रक्तपेढीचे उद्धव देशमुख, डॉ. मनीषा राठोड आणि थॅलेसेमियाग्रस्तांसाठी काम करणारे लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
१०३ जणांचे रक्तदान
या शिबिरात सकाळपासून युवक, महिलांचा रक्तदानासाठी उत्स्फूर्त सहभाग मिळाला. दुपारी १२ वाजेपर्यंत अनेकांनी स्वतःहून रक्तदान करून शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सायंकाळी ४ वाजेपर्यंत १०३ जणांनी रक्तदान केले.