परभणी : शहरातील त्रिमूर्तीनगर भागात खिडकीचे ग्रील तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. दोन दिवसांपूर्वीच गजानन नगर भागात चोरट्यांनी तीन घरे फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्रिमूर्तीनगर भागात चोरीची घटना घडली आहे. या ठिकाणी शेजारी असलेली दोन घरे चोरट्यांनी फोडली.
राजकुमार तिप्पट यांचे त्रिमूर्तीनगर भागामध्ये निवासस्थान आहे. ते काही कामानिमित्त कुटुंबीयांसह पुणे येथे गेले होते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्या - चांदीचे दागिने, रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. त्याचप्रमाणे याच घराच्या शेजारी असलेल्या घरातही चोरट्यांनी प्रवेश करीत रोख रक्कम पळविली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक कुसुमे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे दोन्ही घटनेत एकूण किती रुपयांचा ऐवज लंपास झाला, याची माहिती समजू शकत नाही. मात्र, सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गजानन नगरात तीन घरे फोडण्याचा प्रयत्न
शहरातील कारेगाव रोडवरील गजानननगर भागात तीन घरे फोडण्याचा प्रयत्न सोमवारी मध्यरात्री झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गजानन नगर येथील विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे असलेल्या एका घराच्या खिडकीला लावलेल्या जाळ्या काढून चोरीचा प्रयत्न झाला. याच भागातील आनंदनगर येथील एका घरातही चोरीचा प्रयत्न फसला. दरम्यान, घटनेची माहिती समजताच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी या भागात येऊन पाहणी केली. परंतु चोरटे आढळले नाहीत. शहरात चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.