गंगाखेड : कोरोनामुळे सर्व व्यवसाय बंद पडले. लॉकडाऊनचा फटका शरीर विक्री करणाऱ्यांनाही बसला. त्यामुळे आपली उपजीविका भागवावी कशी, या विवंचनेतून आमच्या मैत्रिणीचे दागिने लुटण्याचा डाव मैत्रिणीनेच रचला. या लूट प्रकरणात दोन आरोपींचा पोलिसांनी कसून तपास करून मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यामुळे खर्चासाठी पैसे नसल्याने मैत्रिणीलाच लुटल्याचा प्रकार ३० मार्च रोजी गंगाखेड शहरात घडला.
गंगाखेड-परभणी मार्गावर अल्पवेळासाठी आंबटशौकिनांना ढाब्याच्या पाठीमागील रूम भाड्याने देऊन कमाई करण्याचे साधन सुरू होते. नियमित येणारे आंबटशौकिन धाब्यावर दारू, मटन खाऊन आपल्या शरीराची भूक भागवीत होते. मात्र, मार्च २०१९ पासून कोरोनाच्या संसर्ग आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे सर्व व्यवसायासह धाबेही बंद पडले. त्यामुळे परभणी- गंगाखेड मार्गावरील धाब्याच्या पाठीमागील रूममध्ये सुरू असलेला वेश्या व्यवसायही बंद पडला. त्यामुळे आपली उपजीविका भागवायची कशी असा प्रश्न हा व्यवसाय करणाऱ्या दोन मैत्रिणींना पडला. त्यामुळे एकीने ३० मार्च २०२१ रोजी आपल्याच मैत्रिणीचे दागिने लुटण्याचा बेत दोघा जणांना सोबत घेऊन आखला. त्यानुसार दुचाकीवरून दोघेजण ठरलेल्या वेळेनुसार चेहऱ्याला काळा रंग लावून धाब्याच्या मागील बाजूस असलेल्या खोलीमध्ये ३० मार्च २०२१ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोहोचले. त्यानंतर या खोलीमध्ये असलेल्या एका महिलेच्या गळ्याला चाकू लावून अंगावरील दागिने जबरदस्तीने काढून घेतले. यामध्ये चार तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या, सात ग्रॅम वजनाचे झुंबराचा समावेश होता. चोरीस गेलेल्या दागिन्याची फिर्याद या महिलेने गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी रीतसर गुन्हा नोंद केला. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड व सहायक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे यांच्यावर या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली. या दोघांनी या तक्रारीच्या अनुषंगाने खबऱ्याद्वारे माहिती घेण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी चोरी करण्यासाठी दुचाकीचा वापर केला असल्याने पोलिसांनी या दुचाकीचा शोध घेतला. मात्र, या दुचाकीचा शोध पोलिसांना लागत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करून एकाच खोलीमध्ये राहणाऱ्या दोन महिलांपैकी एका महिलेने दागिने लुटण्यास कोणताही विरोध केला नसल्याने यातील एका महिलेवर बळावला. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून १ जून २०२१ रोजी एका संशयितास अटक केली. या संशयितास पोलिसांनी खाक्या दाखविताच आरोपी साईनाथ बालाजी सोनवणे चोरी केल्याचे मान्य करून घटनाक्रम नमूद केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी साईनाथ सोनवणे यास गंगाखेड न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने पीसीआर दिला. त्यानंतर पोलिसांनी घटनेच्या मुळात जाऊन तपास केला असता साईनाथ सोनवणे याने दागिने विकल्याचे सांगितले. त्यानंतर चार तोळ्यांच्या पाटल्या घेऊन पसार झालेल्या मुन्ना साळवेचा शोध घेत असताना फिर्यादीची मैत्रिणी पळून गेली. त्यामुळे यामध्ये मैत्रिणीनेच सोने लुटीचा डाव आखल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपीस ताब्यात घेऊन या घटनेचा उलगडा केला.
आरोपीकडून दुसऱ्या आरोपीवर केला कत्तीचा वार
मुन्ना साळवे याने या घटनेत असलेल्या साईनाथ सोनवणे याचा जामीन झाल्यावर चोरीच्या घटनेत मला फरार व्हावे लागले, असे म्हणून चोरी केलेल्या सोन्याच्या हिस्स्यावरून झालेल्या वादात साईनाथ सोनवणे याच्यावर मुन्ना साळवे याने कत्तीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना ७ ऑगस्ट २०२१ रोजी घडली. त्यामुळे आरोपीकडून दुसऱ्या आरोपीवर सोन्याच्या हिस्स्यवरून कत्तीने वार करण्यात आले.