पाथरी : येथील रेणुका शुगर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणेकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे. १०० टन ऊस गाळपास २० हजारांची एंट्री द्यावी लागत असल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे.
पाथरी येथील रेणुका शुगर साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला; मात्र सुरुवातीपासूनच ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणेकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक पळवणूक केली जात आहेत. यावर्षी या भागात अधिक ऊस उत्पादक असल्याने शेतकरी आपला ऊस गाळपास जातो की नाही, या विचारात आहेत. त्यामुळे कारखान्याची बैलगाडी, ट्रॅक्टर यंत्रणेकडून या संधीचा फायदा घेत लूट सुरू केली आहे. कारखान्याच्या प्रशासकीय यंत्रणेचे या प्रकाराकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. तसेच वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण राहिले नसल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला. कारखान्याच्या जवळपासच्या कार्यक्षेत्रात बैलगाडीने ऊस गाळपास आणला जातो. एका बैलगाडीत जवळपास २ ते अडीच टन उसाची वाहतूक केली जाते. एक टन ऊस गाळपास २०० रुपये एंट्री सर्रास घेतली जाते. त्यामुळे बैलगाडीने १०० टन ऊस एका शेतकऱ्याचा गाळप झाला तर २० हजार रुपयांची एंट्री मोजावी लागत आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टरने ऊस तोडणीसाठी एकरी ते ३ ते ४ हजार रुपये एंट्री आणि वाहतूक यंत्रणेचे वेगळेच पैसे मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे ऊस गाळपास घालण्यासाठी पैसे माेजावे लागत असल्याने ऊस उत्पादकांनी सावकारांचे उंबरठे झिजविण्यास सुरुवात केली आहे.
काटा बंद पाडण्याचा इशारा
रेणुका शुगर कारखान्याची तोडणी वाहतूक यंत्रणेकडून एंट्रीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून मोठी रक्कम उकळली जात आहे. हा प्रकार थांबला नाही तर ६ डिसेंबर रोजी साखर कारखान्याचा काटा बंद केला जाणार असल्याची माहिती आ. बाबाजानी दुर्राणी यांनी शुक्रवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.