परभणी : मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाची शासकीय पूजा न करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत टीका केली. ते म्हणाले की, थापा मारणाऱ्या मुख्यमंत्र्यांचंच दर्शन नको, असे संकेत विठ्ठलानेच दिले आहेत. पक्ष बांधणीच्या उद्देशाने राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी परभणी येथे पक्षाच्या मेळाव्यानिमित्त ते आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. उर्वरित महाराष्ट्रातील रिसोर्सेस आणि पैसा वापरून स्वतंत्र विदर्भ करण्याचा घाट भाजपा सरकारने घातला आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केला.
राज ठाकरे म्हणाले, राज्यात सर्वसामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न असताना विकास कामे मात्र केवळ नागपूरला केंद्रस्थानी धरूनच केले जात आहेत. नागपूरच्या विकासाला आमचा विरोध नाही़ परंतु, इतर विभागांना दुर्लक्षत ठेवले जात आहेत. मुंबई ते नागपूर एक्सप्रेस हायवे, मुंबई-नागपूर रेल्वे मार्ग या सर्वांची गरज काय? असा सवाल करीत महाराष्ट्राचा पैसा वापरून स्वतंत्र विदर्भ राज्याची आखणी केली जात असल्याचे ते म्हणाले. केंद्र आणि भाजपाचे सरकार हे माझ्या आतापर्यंतच्या पाहण्यातील सर्वात खोटारडे सरकार असल्याचाही आरोप त्यांनी केला.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ते म्हणाले, केवळ युवकांना झुलवत ठेवण्याचे काम केले जात आहे, सत्य काय आहे हे त्यांनी सांगितले पाहिजे़ ही एक राजकीय खेळी असल्याचेही ठाकरे म्हणाले. मराठवाड्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही. मराठवाड्याला राज्यात प्रतिनिधीत्व मिळाले नाही असे नाही. परंतु, अनेक मुख्यमंत्री मराठवाड्यातून झाले असताना सुद्धा हा विभाग विकासापासून दूर असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.