बोरी (जि. परभणी), दि. २६ : गॅस सिलेंडरची नळी अचानक लिक झाल्याने घराला आग लागून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी १० च्या सुमारास जिंतूर तालुक्यातील करवली येथे घडली आहे. यामध्ये घराचेही जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
जिंतूर तालुक्यातील करवली येथील श्यामराव गोरे यांची पत्नी निलावंती गोरे आज सकाळी १० च्या सुमारास घरी स्वयंपाक करीत असताना गॅसची नळी लिकेज झाली. यातून बाहेर पडणा-या गॅसने लागलीच आग पकडली. आग क्षणार्धात वाढत जाऊन संपूर्ण घराला वेढा घातला. याचवेळी आग लागल्याची माहिती मिळताच सरपंच जगन्नाथ चोपडे, उत्तम डोंबे, पंडीतराव घाटूळ, आशाताई गायकवाड, पंडीतराव घोलप, रफीक भाई, मनोज शिंपले आदीनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून जिंतूर येथील अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. यानंतर अग्नीशमन दल व ग्रामस्थांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.
दरम्यान, आग लागल्याने निलावती गोरे या जखमी झाल्या असून त्यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर आगीमध्ये संसारोपयोगी साहित्यासह रोख ३० हजार रुपये व सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज जळून खाक झाला. या घटनेचा पंचनामा तलाठी नितीन बुड्डे यांनी केला. यावेळी पोलीस निरीक्षक सुनिल अवसरमोल, एलपीजी गॅसचे कुणाल जैस्वाल आदींची उपस्थिती होती.