बामणी : काढणीला आलेले सोयाबीन शेतात गंजी करुन ठेवल्यानंतर अतिवृष्टीने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या पथकाने अनेक कागदपत्रांची मागणी केली. शिवाय प्रश्नांचा भडीमार केल्याने संतप्त झालेल्या चौधरणी येथील एका शेतकऱ्याने सोयाबीनची गंजीच पेटवून दिल्याचा प्रकार बुधवारी घडला.
बामणी येथून काही अंतरावर असलेल्या चौधरणी येथील शेतकरी शेख हमीद अब्दुल रज्जाक यांना ७ एकर शेती आहे. यावर्षी त्यांनी संपूर्ण शेतात सोयाबीनचा पेरा केला होता. या भागात चांगला पाऊस झाल्याने सोयाबीनचे पीकही चांगले आले होते. शेतातील सोयाबीन काढणीला आल्यानंतर त्यांनी ते कापून त्याची शेतात गंजी लावली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून या भागात अतिवृष्टी सुरु झाली. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे या भागात चिखल झाल्याने वाहन घेऊन जाता येईना. आशात पाऊसही थांबत नसल्याने शेख हमीद हे हतबल झाले. याच दरम्यान, अतिवृष्टीमुळे गंजीतील सोयाबीन काळे पडले. त्याचा उग्रवास येऊ लागला. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने त्यांना या पिकाची परिस्थिती पाहून काय करावे, हे कळेना.
बुधवारी दुपारी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शेतातील नुकसानीचा पंचनामा केला. पंचनाम्याच्या वेळी त्यांना या पथकातील कर्मचाऱ्यांकडून विविध कागदपत्रांची मागणी केली गेली. शिवाय अनेक अनावश्यक प्रश्न विचारल्याने ते अस्वस्थ झाले. पंचनामा करुन पथक निघून गेले. त्यानंतरही शेतकरी शेख हमीद हे शेतामध्येच थांबून होते. पोटच्या पोराप्रमाणे पिकाला वाढवून मोठं केलं. उत्पादन निघेल, असे वाटत असताना अतिवृष्टी झाली आणि सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालं. सरकारकडून मदत मिळेल, असं वाटलं; परंतु, पंचनाम्यासाठी आलेले कर्मचारी अनेक कागदपत्रांची मागणी करु लागले. त्यामुळे मदत मिळेल की नाही, याबाबत त्यांना शंका वाटू लागली. याच अस्वस्थेतून त्यांनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रागाच्या भरात शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग लावून दिली. जवळपास ३५ ते ४० पोते सोयाबीन होईल, असा अंदाज असलेली ही गंजी काही वेळातच जळून खाक झाली.