परभणी : शहरातील विवेकनगर येथे १४ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या कविसंमेलनात देशभक्तीसह प्रेमाच्या कविता सादर करून उपस्थित कवींनी उत्कट भावनांचे सादरीकरण केले.
या कविसंमेलनात कवी महेश देशमुख, दिलीप चारठाणकर, पल्लवी देशपांडे, मधुरा उमरीकर, अनुराधा वायकोस, मनीषा आष्टीकर, संतोष सेलूकर, दीपक कुलकर्णी आदी कवींचा सहभाग होता. ‘ताई धीराची, गुणाची, खंबीर मनाची, मूर्ती ही प्रेमाची, ताई माझी..’ ही कविता महेश देशमुख यांनी सादर केली. ती रसिकांना चांगलीच भावली. ‘आकाश अंथरून खाली, चांदण्यात ती मोहरते.., अलवार मोगरा वेचून, माळता पुलकित होते...!’ ही दिलीप चारठाणकर यांची प्रेम कविता दाद मिळवून गेली. संतोष सेलूकर यांनी ‘या दिव्याच्या सोबतीला ही जिवाची वात आहे, अंतरिची वेदना पुन्हा तेच गीत गात आहे, राहिले कोणत्या दिशेला स्वप्नातले गाव माझे, मी असा वेडावुनी सांगा कुठे जात आहे’ ही कविता सादर केली. मनीषा आष्टीकर यांच्या ‘काळजाच्या पानावर फक्त तुझं नाव रं, अजूनही आठवतो सख्या तुझा गाव रं!’ या कवितेने वातावरण प्रफुल्लित केले. ‘काळजाच्या पायथ्याशी वेदनेचे गाव आहे, हरवलेल्या त्या क्षणांना आठवणींचा वाव आहे..’ ही कविता अनुराधा वायकोस यांनी सादर केली, तर पल्लवी देशपांडे यांनी ‘स्मरते ती भेट अजुनी सख्या, मंतरलेल्या त्या क्षणांची, हात हाती तुझा माझ्या अन् उमगे ती भाषा नजरेची..’ ही कविता सादर केली. प्रवीण वायकोस यांनी सूत्रसंचालन केले. प्रसन्न भावसार, प्रा. कैलास सुळसुळे, बाळासाहेब यादव, प्रवीण चव्हाण, दिलीप घुंबरे, सचिन देशमुख, सुधीर सोनूनकर, मनीषा उमरीकर, प्रिया देशपांडे आदींची यावेळी उपस्थिती होती.
का सोडुनी सांग आम्हास गेला.....
मधुरा उमरीकर यांनी देशासाठी लढणारा सैनिक शहीद झाल्यावरची भावना कवितेतून सादर केली. मधुरा म्हणतात... ‘कसा सोडुनी सांग आम्हास गेला, किती जीवनाचा फिका रंग झाला, कसे सांग पोसू तुझ्या अंकुराला, कसा काय बाबा पिलांचा हरवला...’ या कवितेस मोठी दाद मिळाली. या कवितेने उपस्थितांना भावनाविवश केले.