परभणी : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालात महाविकास आघाडीने बाजी मारत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्या खालोखाल भाजपने सुद्धा तीन बाजार समितीवर सत्ता काबीज करत आपले अस्तित्व सिद्ध केले. शनिवारी जिल्ह्यातील सात बाजार समितीच्या झालेल्या मतदानाची मतमोजणी करण्यात आली.
बाजार समितीच्या या आखाड्यात परभणी, गंगाखेड, पूर्णा आणि सेलू या बाजार समितीवर महाविकास आघाडीच्या पॅनलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. तर दुसरीकडे जिंतूर, बोरी आणि ताडकळस या ठिकाणी भाजपने बाजी मारली. परभणी बाजार समितीच्या या निवडणुकीत माजी सभापती समशेर वरपूडकर यांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला तर गंगाखेडमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम आणि आमदार डॉ. रत्नाकर गुंडे यांच्या पॅनलचा पराभव झाला. सेलूत राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांनी भाजपच्या पॅनलचा पराभव केला. तर जिंतूर आणि बोरी या ठिकाणी भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. परभणी जिल्ह्यातील बाजार समितीचे अनुषंगाने शनिवारी सात बाजार समितीचे मतमोजणी नंतर निकाल जाहीर झाले. जिल्ह्यात रविवारी (दि.३०) पाथरी, सोनपेठ आणि पालम या बाजार समितीसाठी निवडणूक होणार असून मानवतची निवडणूक उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे रद्द करण्यात आली आहे.