- अभिमन्यू कांबळे
शिवसेनेने परभणीचा बालेकिल्ला अभेद्य ठेवला आहे़ सलग सातव्यांदा या मतदारसंघातून शिवसेनेने निर्विवाद विजय संपादन केल्याने विरोधातील सर्वच्या सर्व उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे़ येथे शिवसेनेला मित्रपक्षांची भक्कम साथ मिळाली़ त्यामुळे आ़ डॉ़ राहुल पाटील यांचा विजय सुकर झाला़ त्यांनी तब्बल ८१ हजार ७९० विक्रमी मतांनी एमआयएमचा पराभव केला़
पाथरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची एकही सभा झाली नसताना सुरेश वरपुडकर यांनी भाजपचे मोहन फड यांचा १४ हजार ७७४ मतांनी पराभव केला़ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी ताकदीने वरपुडकर यांना साथ दिली़ शिवाय ४० वर्षांचा राजकीय अनुभव पणाला लावत वरपुडकर यांनी राबविलेली प्रचार यंत्रणा फळाला आली़ जिंतूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांना स्वपक्षीयातील नाराजी भोवली़ शिवाय भाजप नेत्यांनी मेघना बोर्डीकर यांच्यासाठी ताकदीने प्रचार केला़ परतूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघना यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते़ त्यांचा येथे भाजपला फायदा झाला़ त्यामुळे बोर्डीकर यांनी भांबळे यांचा ३ हजार ७१९ मतांनी पराभव केला़ गंगाखेड मतदारसंघात रासपचे रत्नाकर गुट्टे यांनी चमत्कार करीत तुरुंगात असताना शिवसेनेचे विशाल कदम यांचा १८ हजार १५८ मतांनी पराभव केला़ येथे राष्ट्रवादीचे विद्यमान आ़ मधुसूदन केंद्रे सहाव्या क्रमांकावर फेकले गेले़
ठळक मुद्दे : 1. राष्ट्रवादीच्या ताब्यातील गंगाखेड व जिंतूर विधानसभा मतदारसंघावर अनुक्रमे रासप व भाजपने कब्जा केला आहे़ 2. शेतकरी कर्ज फसवणूक प्रकरणात तुरुंगात असतानाही रासपकडून निवडणूक लढवत रत्नाकर गुट्टे यांनी विजय मिळविला़ 3. जिल्ह्याच्या राजकारणात ४० वर्षांपासून सक्रिय असलेले सुरेश वरपुडकर- रामप्रसाद बोर्डीकर ही जोडगोळी पाच वर्षानंतर सक्रिय़ 4. १९९० ते २०१९ अशा २९ वर्षातील सात निवडणुकांत परभणीत शिवसेनेने सलगपणे विजय मिळविला आहे़ 5. आचारसंहितेपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाथरीत सभा घेऊनही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले़
पक्षनिहाय विजयी उमेदवार : भाजप1. मेघना बोर्डीकर, जिंतूरशिवसेना1. राहुल पाटील, परभणीकाँग्रेस1. सुरेश वरपूडकर, पाथरीरासपा1. रत्नाकर गुट्टे, गंगाखेड
मेघनांची भांबळेंवर मात जिंतूरच्या राजकारणात १५ वर्षांपासून भांबळे-बोर्डीकर यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे़ २०१४ मधील वडील रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पराभवाचा वचपा काढत मेघना बोर्डीकर यांनी विजय भांबळे यांचा पराभव केला़