परभणी : विधानसभा निवडणुकीअंतर्गत परभणी, पाथरी या दोन विधानसभा मतदारसंघात आघाडीचा तर पाथरी व गंगाखेड मतदारसंघात युतीचा जागा वाटपाचा घोळ मिटता मिटत नसल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
परभणी विधानसभा मतदारसंघ आघाडीतील जागा वाटपानुसार काँग्रेसकडे आहे. येथे काँग्रेसकडून सुरेश नागरे आणि रविराज देशमुख हे इच्छुक आहेत. या शिवाय इतरही इच्छुक आहेत; परंतु, उमेदवारी कोणाला मिळणार हे, निश्चित नाही. आशातच राष्ट्रवादीनेही या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेससह राष्ट्रवादीचेही कार्यकर्ते संभ्रमात आहेत. परिणामी आघाडीतील नेत्यांचा मुंबई दौरा वाढला आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर हे निवडणूक लढणार असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे; परंतु, मध्येच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात त्यांना परभणीतून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे पाथरीतील काँग्रेसचे कार्यकर्ते चलबिचल झाले. आता पुन्हा एकदा पाथरीतूनच त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. जिंतूरमध्ये आघाडीकडून राष्ट्रवादीचे आ.विजय भांबळे आणि गंगाखेडमधून आ.डॉ.मधुसूदन केंद्रे यांचीच उमेदवारी राहणार आहे. त्यामुळे येथे आघाडीत एकवाक्यता आहे.
दुसरीकडे युतीत पाथरी आणि गंगाखेडच्या जागेवरुन घमासाण सुरु आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघ युतीतील पूर्वीच्या जागावाटपानुसार शिवसेनेकडे असल्याने शिवसेना, भाजपाला हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. या मतदारसंघातून शिवसेनेकडून समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील, डॉ.राम शिंदे, डॉ.जगदीश शिंदे, तुषार जाधव, माजी आ.मीराताई रेंगे, सुरेश ढगे आदींसह अनेक दिग्गज नेते इच्छुक आहेत. राज्यस्तरावर शिवसेना-भाजपाची युती झाल्यास अपक्ष म्हणून निवडून आलेले व सध्या भाजपात असलेले आ.मोहन फड हे येथून युतीचे उमेदवार राहणार आहेत. त्यामुळे इच्छुक शिवसेनेच्या नेत्यांची गोची होणार आहे. त्यामुळे पाथरीची जागा कोणाकडे राहणार, याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात युतील मोठी स्पर्धा लागली आहे. रासपचे प्रदेश उपाध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांचा जामीन अर्ज गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्याने त्यांच्या निवडणूक लढविण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे भाजपातील ६ नेत्यांकडून उमेदवारीसाठी पाठपुरावा सुरु करण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची माजी जि.प.सदस्य गणेश रोकडे, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, जि.प.सदस्य डॉ.सुभाष कदम, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भूमरे, विठ्ठल रबदडे, बालाजी देसाई या नेत्यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांना वरिष्ठांकडून सदरील जागा भाजपाकडेच राहणार असल्याचे आश्वासन देण्यात आले असल्याचे त्यांनी शुक्रवारी गंगाखेड येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले. विशेष म्हणजे या सहाही नेत्यांनी आमच्यापैकीच एकाला उमेदवाराला द्यावी, असा आग्रह धरला आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुधाकर खराटे आदींनी येथून उमेदवारी मागितली आहे. तर रिपाइं आठवले गटातर्फे डॉ.सिद्धार्थ भालेराव यांनी येथून उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे गंगाखेडची जागा कोणाकडे राहणार हे अद्याप निश्चित नाही. परभणी मतदारसंघात शिवसेनेकडून आ.डॉ.राहुल पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. शिवसेना- भाजपाची युती राज्यात झाल्यास येथे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांना निवडणुकीच्या रिंगणाबाहेर रहावे लागेल.
वंचित आघाडीच्या उमेदवारांची उत्सुकताजिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे; परंतु, उमेदवार कोण राहणार, हे अद्याप निश्चित नाही. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवरुनही चारही मतदारसंघातील विजयाची गणिते अवलंबून आहेत. च्त्यामुळे वंचितचे उमेदवार कोण राहणार, याची जिल्हा वासियांना उत्सुकता लागली आहे. वंचित नवीन उमेदवारांना संधी देणार की इतर पक्षातून आलेल्यांना संधी देणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.