परभणी : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जिल्ह्यात गुरुवारी कडकडीत बंद पाळला जात असून, या दरम्यान ठिकठिकाणी चक्काजाम आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले. शांततेच्या मार्गाने जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे.
आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, त्या अंतर्गत जिल्ह्यात बंद पाळला जात आहे. परभणी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे.
पाथरी तालुक्यात आष्टीफाटा येथे ५१ बैलगाड्या रस्त्यावर आडव्या लावून चक्काजाम आंदोलन केले जात आहे.
पूर्णा तालुक्यात बुधवारी मध्यरात्रीपासूनच आंदोलनाला सुरूवात झाली असून, समाज बांधवांनी रात्री १२ वाजेच्या सुमारास पूर्णा- नांदेड, झिरोफाटा- नांदेड या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करीत वाहने अडवून धरली.
पालम तालुक्यातील चाटोरी येथे टायर जाळून आंदोलन राज्य शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. तर केरवाडी येथे भजन आंदोलन केले जात आहे.
सोनपेठ येथे परळी रोडवर गवळी पिंप्री येथे मराठा आरक्षणासाठी बैलगाडी लावून रस्ता रास्ता रोको आंदोलन. आंदोलनस्थळी नामदेव महाराज फपाळ यांच्या किर्तनाचे आयोजन केले आहे
परभणी तालुक्यातील झरी फाटा येथेही ठिय्या आंदोलन केले जात आहे. या सर्व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
यासोबतच पूर्णा-औरंगाबाद मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवली असून रेल्वे स्थानकावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे