गंगाखेड : राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांना पैस्यांचे आमिष देण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री तालुक्यातील ईसाद येथे पैसे वाटप करणाऱ्या दोघांना आचारसंहिता पथकाने ताब्यात घेतले. शनिवार (दि.१९ ) पहाटे त्यांच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणूक काळात पैशाच्या वाटपाने राज्यात प्रसिद्धीस आलेल्या गंगाखेड विधानसभा मतदार संघातुन निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांकडून मतदारांना पैशाचे आमिष दाखविले जात असल्याची जोरदार चर्चा सुरु आहेत. यामुळे सतर्क झालेल्या निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी आचारसंहिता पथकास मतदारसंघात घडणाऱ्या घडामोडीवर बारकाईने लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, शुक्रवारी (दि. १८) रात्री ११ वाजेच्या सुमारास तालुक्यातील ईसाद येथे काही लोक मतदारांना पैशाचे वाटप करीत असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वरूप कंकाळ यांना मिळाली. त्यांनी आचारसंहिता पथकातील शिवाजी दामोदर चिखले, पी. एन. स्वामी, पोलीस जमादार बेग, फोटोग्राफर अनिल कांबळे यांच्या पथकाला ईसाद येथे रवाना केले.
रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास पथकाने अहिल्याबाई नगर येथील एका गल्लीतून हातात रजिस्टर घेऊन येत असलेल्या दोन इसमांना आचारसंहिता पथकाने थांबवुन चौकशी केली. तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. तसेच त्यांच्याजवळील रजिस्टरची पाहणी केली असता त्यात 'ईसाद बुथ क्रमांक ३ ' असे लिहून पुढे ४३ पुरुष, महिलांची नावे लिहिलेली यादी मिळून आली. तसेच दि. १६ सप्टेंबर ही तारीख टाकलेले व निळानाईक तांडा ४०० मतदान लिहिण्याबरोबर दौलत मोतीराम चव्हाण १०, रमेश विश्वनाथ राठोड १४, यादी क्रमांक व तिसऱ्या पानावर पाच लोकांची नावे लिहून त्यांच्या नावासमोर पाच हजार, सहा हजार, तीन हजार, सात हजार असे लिहिलेले आढळून आले. रजिस्टरच्या मधल्या जोड पानावर ४३ पुरुष व महिलांचे नावे लिहिलेले व त्यासमोर १, २, ३, ४, ५, ६, ७ असे अंक लिहिलेले आढळून आले. दोघांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ (पाचशे रुपये दराच्या ३४ नोटा) रोख १७ हजार रुपये मिळून आले.
यात दोघेही रासपा उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना मतदान करा म्हणून पैसे वाटप करीत असल्याचे निष्पन्न झाले. यावरून गोपीनाथ वामनराव भोसले (४२, रा. ईसाद ) व संजय नाथराव राठोड (३२,रा. वसंत नगर, परळी ) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी मतदारांची नावे लिहिलेल्या रजिस्टर, रोख रक्कम १७ हजार रुपये तसेच २१५०० रुपये किंमतीचे तीन मोबाईल असा एकूण ३८५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दोघांविरुद्ध मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे वाटप करून आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शनिवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि बालाजी गायकवाड हे करीत आहे.
जेलमधून लढत आहेत रत्नाकर गुट्टे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे हे शेतकरी कर्ज घोटाळा प्रकरणात मागील काही महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. तसेच रासपच्या वाट्याचा हा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेला सुटला आहे. मात्र रत्नाकर गुट्टे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार करत जेलमध्ये असतानाही आपली उमेदवारी दाखल केली आहे. तसेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही गुट्टे यांच्यावर मतदारांना पैसे वाटप केल्याचे दोन गुन्हे दाखल होती.