परभणी : पालम तालुक्यात सोमवारी (दि.२१ ) दिवशी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शहराजवळील लेंडी नदीला पूर आला. यामुळे आल्याने ऐन मतदानाच्या दिवशी 12 गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे अनेक मतदार पुरामध्ये अडकून पडले आहेत.
शहराजवळील लेंडी नदीच्या पात्रात कमी उंचीचा पूल 12 गावांतील ग्रामस्थांसाठी डोकेदुखी बनला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास पालम तालुक्यात जोरदार पाऊस पडला. यामुळे परिसरातील नदी-नाल्यांची पाणी पातळी वाढली आहे. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास लेंडी नदीला मोठा पूर आला. येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने या १२ गावांचा संपर्क शहरापासून तुटला आहे. तसेच पुराचे पाणी वाढत जात असल्याने दिवसभर वाहतूक ठप्प राहण्याची शक्यता आहे.
पुरामुळे मतदानाच्या दिवशीच फळा, आरखेड, सोमेश्वर घोडा, उमरथडी या गावांचा संपर्क तुटला. तर याच नदीवर पालम ते पूयणी रस्त्यावरही पुराचे पाणी आले आहे. यामुळे पुयणी, आडगाव, वनभुजवाडी, तेलजापूर या गावांचा संपर्क तुटला आहे. गावांचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थांना मोठी गैरसोय होत आहे. तसेच मतदानाचा दिवस असल्याने गावाबाहेर गेलेल्या मतदारांना मतदानासाठी गावात येताना मोठी कसरत करावी लागत आहे. ग्रामस्थांना वाहने घेऊन शिरपूर सायाळा मार्गे गाव गाठावे लागले होते.