सेलू : शेतकरी, शेतमजूर, युवक व महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी तसेच मतदार संघाचा समृद्ध विकास करण्यासाठी भाजपाला सत्तेत आणा, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केले़
जिंतूर विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ सेलू येथील बोर्डीकर मैदान येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झाली़ यावेळी ते बोलत होते़ व्यासपीठावर माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर, उमेदवार मेघना बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, शशिकांत देशपांडे, तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, सुरेश भुमरे, विलास गिते, नगराध्यक्ष विनोद बोराडे, रवींद्र डासाळकर आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोलताना मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की, भाजप हा विकास करणारा पक्ष असून, काही व्यक्तींनी धार्मिक तेढ निर्माण करून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला आहे़ भाजप मात्र विकास याच संकल्पनेवर आधारित असून, केंद्रात भाजपचे सरकार असल्याने व राज्यातही पुन्हा भाजपचेच सरकार येणार असल्याने जिंतूर मतदार संघाचे नेतृत्वही भाजपलाच सोपवावे, जेणे करून मतदार संघातील विकासाची प्रलंबित कामे मार्गी लावता येतील, असेही ते म्हणाले़ २०१४ पूर्वी भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर तेराव्या क्रमांकावर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीतून निर्णय घेतल्याने ती पाचव्या क्रमांकावर आली आहे. लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर येईल. महिला सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारने उल्लेखनीय कार्य केले असल्याचे सांगितले.
सध्याच्या लोकप्रतिनिधींकडून विकास कामात अडथळेलोकप्रतिनिधींनी विकासाच्या मुद्यावर काम केले पाहिजे; परंतु, सध्याचे लोकप्रतिनिधी हे राज्य व राष्ट्रीय महामार्ग बनविताना अडथळा निर्माण करीत असून, जवळच्या कार्यकर्त्यांना आर्थिक पाठबळ देत आहेत़ अशा लोकप्रतिनिधींना दूर सारले पाहिजे, असे यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले़ येणाऱ्या काळात भाजप सरकार मूलभूत विकासावर भर देणार असून, विकासाचे राजकारण करणाऱ्या पक्षाला निवडून द्यावे, असे त्यांनी आवाहन केले़
मतदारसंघाचा विकास हाच ध्यास-बोर्डीकरयावेळी बोलताना उमेदवार मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघाचा विकास हाच माझा ध्यास आहे़ उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला निर्धार सोडणार नाही आणि सर्वसामान्यांचा विचार असलेले कोणाचेही मन कधीही दुखावणार नाही़ नेहमी विकास कामांच्या जोरावर मिळविलेलं प्रेम टिकवून ठेवून विकासाचेच राजकारण करणार आहे़ त्यामुळे जनतेने साथ द्यावी, असे आवाहन यावेळी बोलताना मेघना बोर्डीकर यांनी केले़