परभणी : स्वपक्षातील किंवा मित्र पक्षातील नेत्यांशी असलेले वाद बाजुला ठेवून मनोमिलन झाल्याच्या चर्चा जिल्ह्यातील काही नेत्यांच्या संदर्भात सुरु असल्या तरी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी मात्र हे नेते गायब असल्याने मतभेदाच्या चर्चा कायम आहेत.
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातून दिग्गज नेत्यांनी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. परभणीत आ.डॉ.राहुल पाटील यांनी शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली. यावेळी त्यांनी रॅलीच्या माध्यमातून मोठे शक्तीप्रदर्शन केले. यावेळी खा.बंडू जाधव हे गैरहजर दिसून आले. तसेच भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे हे ही गैरहजर होते. दोन दिवसांपूर्वीच खा.जाधव आणि भरोसे यांच्या सोबतची आ.पाटील यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. शिवाय या नेत्यांमधील राजकीय मतभेद मिटल्याची चर्चा सुरु होती. असे असताना गुरुवारी अर्ज दाखल करताना मात्र हे दोन्ही नेते आ.पाटील यांच्या सोबत दिसून आले नाहीत.
गंगाखेडमध्ये आ.डॉ.मधुसूदन केंद्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी दिसून आले नाहीत. आ.डॉ.केंद्रे व आ.दुर्राणी यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मतभेद निर्माण झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी आ.केंद्रे व आ.दुर्राणी हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. शिवाय त्यांनी त्या कार्यक्रमांत हस्तांदोलनही केले होते. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकसंघपणे निवडणूक लढविण्याचे आवाहन केल्याने या नेत्यांमधील मतभेद संपल्याची चर्चा होती; परंतु, गुरुवारी उमेदवारी दाखल करताना मात्र डॉ.केंद्रे यांच्या सोबत आ.दुर्राणी दिसून आले नाहीत.
पाथरीचे आ.मोहन फड व शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्यातही अनेक महिन्यांपासून मतभेद आहेत. शिवसेना-भाजपाची राज्यात विधानसभेसाठी युती झाली आहे. त्यामुळे आ.फड यांनी दोन दिवसांपूर्वीच खा.जाधव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी खा.जाधव यांनी पाथरी विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकविणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना मात्र आ.फड यांच्या सोबत खा.जाधव नव्हते. असे असले तरी पाथरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रमुख नेते गैरहजर असले तरी प्रचारात ते दिसतील, असा विश्वास संबंधित उमेदवारांचे समर्थक करीत आहेत.