परभणी- शिवसेनेने जाहीर केलेल्या वचननाम्यातील प्रत्येक बाबीची पडताळणी करण्यात आली आहे़ काना, उकार, मात्रा सगळे तपासून, पडताळून जबाबदारीने हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यात कुठलीही प्रिंटींग मिस्टेक नाही, त्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण करणार आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केले़
परभणी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ़ राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ परभणी येथे आयोजित जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर खा़ संजय जाधव, शिवसेनेचे उपनेते विश्वनाथ नेरुरकर, उमेदवार डॉ़ राहुल पाटील, माजी आ़ विजय गव्हाणे, भाजपाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ़ विवेक नावंदर, रिपाइंचे डॉ़ सिद्धार्थ भालेराव, डी़एऩ दाभाडे, शिवसंग्रामचे सुभाष जावळे आदींची उपस्थिती होती़
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या निवडणुकीत समोर कोणीच दिसत नाही़ काँग्रेस म्हणून जो काही प्रकार देशात होता तो आता दिसत नाही़ त्यामुळे काँग्रेस विषयी काय व कोणावर बोलावे? हेच समजत नाही़ काँग्रेसचा बुड आणि शेंडा काहीही उरला नाही, असेही ते म्हणाले़ शरद पवार यांच्याविषयी आपणाला आदर आहे़ ते फिरत आहेत; परंतु, ते किती बोलतात, आता हे सरकार घालविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे ते सांगतात़ मग, २०१४ साल आठवा़ निकालाचा दिवस आठवा़ त्यादिवशी संपूर्ण निकाल लागण्याअगोदरच भाजपाला बिनशर्त पाठिंबा कोणी जाहीर केला होता? शरद पवार यांचे प्रफुल्ल पटेल यांनी तसे जाहीर केले होते़ त्यावेळी तुम्ही लोटांगण घातले होते़ मग, आम्ही उघड उघड केलं़ कारण आम्ही एका विचाराचे माणसं आहोत़ तुमच्याकडे आचार ना विचार जिकडे सत्ता तिकडे तुम्ही आणि आज आम्ही एकत्र आल्यावर सांगता की हे सरकार घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही़ माणसं स्वस्थ बसू नये, हे खरं आहे़; परंतु, तुम्ही कितीही आदळआपट केली तरी हे सरकार जाणार नाही़ आयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे ही आमची मागणी कायम आहे, ती सोडणार नाही; परंतु, न्यायालयाचा निकाल येतोय, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे़ त्यामुळे आम्ही थांबलो आहोत़ राम मंदिरासाठी उठलेल्या हातांना आम्ही वाºयावर सोडणार नाही, त्यांच्या हातांना काम देण्याची आमची जबाबदारी आहे़ यासाठी शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यात कसल्याही प्रकारची प्रिंटींग मिस्टेक नाही़ अत्यंत जबाबदारीने पूर्ण पडताळून काना, उकार, मात्रा सर्व बाबींची तपासणी करून हा वचननामा प्रसिद्ध केला आहे़ त्यातील प्रत्येक आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत़ विरोधक निवडणुका आल्या म्हणून आश्वासने दिली असल्याचे म्हणत आहेत; परंतु, आम्ही बोलत नाही तर करून दाखवितो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले़