येलदरी वसाहत (परभणी ) : राजकारणी मंडळी कधी काय नवीन फंडा काढतील याचा नेम नाही सध्या चालू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध पक्षाकडून प्रचाराचे नवनवीन प्रयोग पहावयास मिळत आहेत जिंतूर सेलू विधानसभा निवडणुकीत देखील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने देखील आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी पारंपरिक पद्धतीने लोककला सादर करणाऱ्या वासुदेव या कलाकारांचा उपयोग केला आहे हे वासुदेव मतदारसंघात पहाटेच प्रत्येक गावात जाऊन आपल्या कलेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत या मुळे ग्रामीण भागात वासुदेव सध्या चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे.
वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग - गवळणी गात दान मागणारा लोककलाकार आहे. डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायांत विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ कमरेला पांवा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी,गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा,हातात तांब्याचे कडे,कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे या वेषामुळे वासुदेव अगदी ठळकपणे ओळखू येतो. वासुदेव मुख्यत: क्षेत्राच्या ठिकाणी आढळून येतो. तो खेड्यापाड्यात नेहमी आणि शहरांतही कधीमधी दिसतो.
वासुदेव हा तीर्थक्षेत्रांत स्नान करायला आलेल्या मंडळींना नाना तीर्थक्षेत्रांची आणि तिथल्या देवतांची नावे सांगतो. त्या अर्थाने वासुदेव तीर्थांचा चालताबोलता कोशच आहे. वासुदेवाला पैसे दिले की तो सगळ्या दैवतांच्या नावाने पावती देतो, आणि मग अलगूज वाजवतो. वासुदेव सहसा कुणालाही आपणहून पैसे मागत नाही. मुळातच कृष्णभक्ती हा त्याच्या आयुष्याचा पाया असल्याने वासुदेवाच्या मुखात शक्यतो कृष्णलीला वर्णन करणारीच गाणी असतात. वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक संस्थाच होती. या वासुदेवाच्या साहाय्याने छत्रपति शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या घरी निरोप पाठवले आहेत. तसेच वासुदेवाचा हेरगिरीसाठी उपयोग करून शत्रूंच्या गोटातल्या बातम्याही मिळवल्या आहेत.याच गोष्टीचा फायदा विविध पक्ष सध्या घेतांना दिसून येत आहेत