परभणी : विनापरवाना प्रचार कार्यालय सुरू करणे आणि वाहनावरुन प्रचार केल्याच्या कारणावरुन गंगाखेड विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अपक्ष उमेदवारांवर तसेच रासप उमेदवाराच्या प्रतिनिधीविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन केलेल्या भरारी पथकाचे प्रमुख औदुंबर डुब्बेटवार यांनी या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या तक्रारी नोंदविली आहेत. त्यानुसार गंगाखेड मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार विठ्ठल जवादे यांनी परळी रोड परिसरात विना परवाना प्रचार कार्यालय सुरू करुन आचारसंहितेचा भंग केला. या प्रकरणी विठ्ठल जवादे यांच्यासह प्रचार कार्यालयाचे प्रमुख नामदेव साठे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
शहरातील शिवशक्ती हॉटेल येथे अपक्ष उमेदवार संतोष मुरकुटे यांनी कार्यकर्त्यांसाठी विनापरवाना जेवणाची व्यवस्था केल्याच्या कारणावरुन त्याचप्रमाणे एम.एच.१७/एजी ८२७६, एम.एम.२२/एए १६७९, एम.एच.४४/७९३७ या वाहनांवर विनापरवाना संतोष मुरकुटे यांचे कटआऊट लावून विनापरवाना प्रचार केल्याच्या कारणावरुन संतोष मुरकुटे आणि हॉटेल व्यावसायिक केशव केंद्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांचे निवडणूक प्रतिनिधी मिलिंद राजेभाऊ क्षीरसागर आणि राजेभाऊ पाळवदे यांच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. एमएच २२ एए- ५९७, एमएच २२ एएन-०४३०, एमएच २२ केएन- ०४१८, एमएच २२ एए-९९६, एमएच २२ एएन-१७५१ तसेच एमएच ३८ ए ९४२, एमएच २२ एए-१७०१, एमएच २२ एए-१८६५, एमएच २२ एएन-०५१३ अशा ९ वाहनांवर रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांचे छायाचित्र व निवडणूक चिन्हाचे कटआऊट विना परवाना लावल्याने गुट्टे यांचे प्रतिनिधी मिलिंद क्षीरसागर आणि या वाहन चालकांची जेवणाच्या सुविधेसाठी विना परवाना हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था केल्या कारणावरून राजाभाऊ पाळवदे यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे़ या तिन्ही प्रकरणाचा तपास हेकॉ दीपक भारती हे करीत आहेत़