परभणी : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बनविण्याचे आश्वासन दिले़ प्रधानमंत्र्यांना बोलावून आज तीन वर्षे झाली़ तिथं काहीही झालेलं नाही़ वाटलं तर बघा जाऊन, समुद्रात काही दिसतयं का? नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे घ्यायचं आणि धंदा फसवणुकीचा करायचा, असा प्रकार या लबाड राजकर्त्यांनी सुरू केला आहे़ त्यामुळे आता जनता सुज्ञ झाली असून, त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा़ शरद पवार यांनी येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना केले़
परभणी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पदाधिकारी-कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते़ यावेळी खा़ पवार बोलत होते़ व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ विजय भांबळे, आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे, आ़ रामराव वडकुते, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, शहराध्यक्ष स्वराजसिंह परिहार, प्रदीप सोळंके आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आज नाशिक येथे पंतप्रधानांची सभा होती़ तेथील विरोधी पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या गेल्या़ काहींना अटक केली गेली़ शेतकरी संकटात आहेत तरीही बाजारात कांदा आणायचा नाही म्हणून तेथील शेतकऱ्यांना सांगितले गेले़ शेतकऱ्यांची एवढी भीती त्यांना का वाटावी? मी चौकशी केली, कांद्याचे भाव कोसळल्याने येथील शेतकरी पंतप्रधानांच्या वाहनावर कांदे फेकतील म्हणून असे आदेश काढल्याचे तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले़ कांद्याचे भाव कोसळण्यास कोण जबाबदार आहे? पाकिस्तानचा कांदा भारतात का आणला? भारतातला कांदा चालत नाही का? असा सवाल करून ते म्हणाले, तेथे शेतकऱ्यांना तुरूंगात टाकण्यात आले, आता स्वाभिमानाची भावना असलेला प्रत्येक जण हा अन्याय सहन करणार नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या या सरकारला सत्तेतून हटविल्याशिवाय जनता शांत बसणार नाही, असेही ते म्हणाले.
मुंबईतील अरबी समुद्रात देशाला अभिमान वाटावे असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचे सरकारने घोषित केले़ पंतप्रधानांना तेथे बोलावून तीन वर्षे झाले, कोणी मुंबईला गेलंय का, बघा त्या समुद्रात काही दिसतयं का? कशाचा काय पत्ता नाही़ नाव छत्रपती शिवाजी महाराज यांचं घ्यायचं आणि धंदा मात्र फसवणुकीचा करायचा, असं हे राज्यातील भाजपा सरकार आहे़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाबाबतही असेच खोटे आश्वासन दिलं गेलं आहे, असेही खा़ पवार म्हणाले़. भाजपावर टीका करताना ते म्हणाले, तुमच्याकडे संपत्तीचा डोंगर असेल; परंतु, माझ्याकडे तरुण पिढीचा समुद्र आहे आणि या तरुण पिढीच्या समुद्रात तुमचा डोंगर उद्ध्वस्त करण्याची ताकद आहे़ त्यामुळे आता हे तरुणच तुम्हाला सत्तेतून घालवतील, असेही ते म्हणाले़ यावेळी आ़ धनंजय मुंडे, आ़ दुर्राणी, आ़ भांबळे, आ़ केंद्रे यांची भाषणे झाली़
१५ वर्षे मंत्री केलं तेव्हा काय केले?जे सोडून गेले त्यांची मला चिंता नाही़ १९८० मध्ये ६० आमदार निवडून आणले़ विदेश दौऱ्यावर गेलो आणि आठ दिवसातच ५२ आमदार पक्ष सोडून गेले़ जाऊ द्या म्हणालो़ नव्याने निवडणूक लागली़ ५२ पैकी एकही आमदार निवडून आला नाही़ आता ही सोडून जाणारे पवार साहेब आमच्या हृदयात आहेत असे सांगत आहेत़ तुमचं हृदय केवढं (मिश्कीलपणे) आणि मी केवढा़ मी तुमच्या हृदयात कसा मावणार? म्हणताहेत विकास करायचा म्हणून सोडून जातोय, मग तुम्हाला १५ वर्षे मंत्री केलं त्या काळात काय केलात़़ असेही शरद पवार म्हणाले़ जााणाऱ्या लोकांवर भरोसा ठेवू नका़ आजचे तरुण खूप हुशार आहेत़ ते त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असेही ते म्हणाले़