चुडावा या ग्रामपंचायतीच्या निकालात ग्रामस्थांनी आपला कल राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शहाजी देसाई यांच्या पॅनलकडे दिला, तर नव्याने उदयास आलेल्या तरुणांच्या युवा पॅनललाही दोन जागा जिंकण्यास यश आले आहे. आलेगाव ग्रामपंचयतीमध्ये मनसे जिल्हाप्रमुख रुपेश सोनटक्के व गजानन सवराते यांच्या पॅनलला बहुमत प्राप्त झाले. सुहागन ग्रामपंचायतीकडे विशेष लक्ष लागले होते. राज्यभरात सर्वत्र शिवसेना - भाजप हे एकमेकांच्या विरोधात असताना सुहागण येथे ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दाजीबा भोसले व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख दशरथ भोसले यांनी संयुक्तरित्या पॅनल करून ही निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना भरघोस यश प्राप्त झाले. ग्रामपंचायतीच्या निकालानंतर सर्वच पक्ष आपल्याला किती जागा मिळाल्या, याचे गणित लावत आहेत. अपक्ष व पक्षविरहीत उमेदवारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्नही युद्धपातळीवर सुरू झाले आहेत.
आता सरपंचाची चर्चा
निवडणुकीच्या निकालानंतर आता सरपंच पदाच्या सोडतीकडे विजयी उमेदवारांचे लक्ष वेधले आहे. सरपंच पदासाठी सुटणाऱ्या आरक्षणावर तर्क वितरक लावले जात आहेत. अनेकांनी आपणच सरपंच म्हणून स्वयंघोषणाही केल्या आहेत.