आडगाव बाजार (जि. परभणी) : वारंवार मागणी करुनही महावितरण नविन विद्यूत रोहित्र बसवून देत नसल्याने प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना जिंतूर तालूक्यातील आडगाव बाजार येथे २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली.
आडगाव बाजार येथिल माजी चेअरमन प्रल्हाद रामकिशन दाभाडे यांनी गावातील ३३ के.व्ही.उपकेंद्रातंर्गत आडगाव बाजार, वस्सा व टाकळखोपा येथिल ११ के.व्ही.फीडरवर अतिरिक्त वीजेच्या दाबामुळे वारंवार परिसरातील वीजपुरवठा खंडित होत आहे. परिणामी, विहिरीत पाणी असूनही शेतकऱ्यांना उभ्या पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. ज्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. यामुळे आडगाव बाजार येथील ३३ के.व्ही.उपकेंद्रात नविन ५ केव्ही क्षमतेचा विद्यूत रोहित्र त्वरित बसविण्याची मागणी केली होती. तसेच आपली मागणी पूर्ण न केल्यास प्रजासत्ताकदिनी आत्मदहन करण्याचा इशारा महावितरणला लेखी निवेदनाद्वारे दिला होता. मात्र महावितरणने त्याच्या मागणीकडे दूर्लक्ष केले. त्यानुसार प्रल्हाद दाभाडे यांनी प्रजासत्ताकदिनी आडगाव बाजार येथील ३३ केव्ही उपकेंद्र कार्यालया समोर अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागेपरिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भोगाव येथिल सहाय्यक अभियंता देवा पवार ,दीपक क्षिरसागर यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. आगामी १५ ऑगस्ट पर्यंत आडगाव बाजार येथे ५ केव्ही क्षमतेचा नविन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे लेखी आश्वासन महावितरणने दिल्यानंतर प्रल्हाद दाभाडे व शेतकऱ्यांनी आपले आत्मदहन आंदोलन स्थगित केले. जिंतूरचे पोलीस निरीक्षक विकास कोकाटे. आडगाव बाजारचे बीट जमादार नारायण दुधाटे यांनी यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.