मित्र मंडळींकडून मदत जमा करून जेवणाची तयारी सुरू झाली. कोणी भाजीखरेदीच्या कामात, कोणी स्वयंपाकाच्या कामात, तर कोणी अन्नवितरण आणि अडचणीतील नागरिकांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले. शहरातील अनेक डॉक्टर्स, वकील, व्यापारी आणि सेवाभावी नागरिकांनी यात सहभाग घेऊन मदतकार्य सुरू केले. दररोज चार वाहनांच्या साहाय्याने अन्न पाकिटांचे वितरण केले जात होते. शासकीय रुग्णालय, एम.आय.डी.सी. भागात अडकलेले परप्रांतीय, झोपडपट्टी भागातील नागरिकांसह प्रशासनाकडून मदत करण्यासाठी मिळालेल्या यादीनुसार दररोज जेवण पुरविण्याचा उपक्रम या मंडळींनी राबविला. विशेष म्हणजे, पोळी-भाजी, वरण-भात असे जेवण दररोज दिले जात होते. त्यासाठी येणारा खर्चही याच संस्थांनी स्वत:हून उचलला. पहिल्या दिवशी १०० डब्यांपासून सुरू झालेल्या या उपक्रमात पुढे दररोज ९०० डब्यांपर्यंत जेवण पुरविण्याचे काम या संस्थांनी केले आहे.
कोरोनाच्या या संकटकाळात अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. कोणी अन्नधान्य वितरित केले, कोणी रोख पैशांची मदत केली. मात्र, या पाच संस्थांनी थेट जेवण पुरविण्याचा ५५ दिवस राबिवलेला उपक्रम अनेकांच्या स्मरणात राहणारा ठरला.