सेलू येथील अपघात प्रकरणात कलम ३०२ वाढ करून साक्षीदारांच्या चौकशीतून पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींची पोलीस कोठडी गुरुवारी संपली. या चौघांना सेलू न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एका आरोपीस न्यायालयीन कोठडी, तर तीन आरोपींना १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या खून प्रकरणातील आरोपी फरार होता. त्याने अटकपूर्व जामिनासाठी परभणी जिल्हा सत्रन्यायालय येथे अर्ज केल्यानंतर ७ व ११ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली होती. यावेळी दोन्ही बाजूने वकील हजर होते. सरकारी वकिलांनी म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितल्याने या प्रकरणाची सुनावणी १७ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपीस हैदराबाद येथून १२ ऑगस्ट रोजी सकाळी अटक केली. पोलीस प्रशासनासमोर आरोपीची ओळखपरेड केल्याची माहिती समोर आली आहे.या मुख्य आरोपीस सेलू येथे न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे समजते. गुरुवारी ४ आरोपींची कोठडी संपल्याने त्यांना १४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपीच्यावतीने ॲड. विष्णू ढोले, ॲड. सुनीता उदगिरे यांनी, तर सरकारी पक्षातर्फे ॲड. अनिता धुळे यांनी काम पाहिले. याबाबत पोलीस प्रशासनाकडून मात्र प्रसारमाध्यमांना माहिती दिली गेली नाही.