परभणी शहरासह परिसरात गुरुवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसास सुरुवात झाली. सकाळी १० वाजेपर्यंत पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिंतूर तालुक्यातील येलदरी, सावंगी म्हाळसा, माणकेश्वर, आंबरवाडी, किन्ही, सावळी, घडोळी, मुरूमखेडा, हिवरखेडा, सावळी, केहाळ भागात तसेच मानवत तालुक्यातील मानोली, रामपुरी व पालम तालुक्यातील बनवस,सेलू तालुक्यातील कुपटा, वालूर, देवगाव फाटा, वलंगवाडी, मापा, हातनूर, चिकलठाणा, मोरेगाव, गंगाखेड तालुक्यातील खळी व अन्य परिसरात तसेच पाथरी तालुक्यातील रामपुरी, बाभळगाव आदी परिसरातील गव्हाच्या पिकाचे तसेच हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्या शेतात गहू, हरभरा आदी पिके काढण्याचे काम सुरू आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतात काढून ठेवलेली पिके भिजून गेली. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी झालेल्या नुकसानीची महसूल व कृषी विभागाकडून माहिती मागविली आहे.
जिल्ह्यात सलग दोन दिवस पाऊस
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. बुधवारी जिल्ह्यात ७.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. गुरुवारी सकाळीही महसूल विभागाकडे जिल्ह्यात ८.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात परभणी तालुक्यात ७.४ मिमी, गंगाखेड तालुक्यात ५.६ मिमी., पाथरी तालुक्यात १२.८ मिमी., जिंतूर तालुक्यात ६.४ मिमी, पूर्णा तालक्यात ४.३ मिमी, पालम तालुक्यात ३.९ मिमी, सेलू तालुक्यात ९.८ मिमी, सोपेठ तालुक्यात १२.८, आणि मानवत तालुक्यात ७.५ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.