परभणी : वर्षभरात सर्वच सण, उत्सव धुमधडाक्यात साजरे होतात. प्रत्येक सणाचे आगळे-वेगळे महत्त्व असते. याप्रमाणे संक्रांतीलाही पतंगोत्सवामुळे ओळखले जाते. अगदी चिमुकल्यापासून तरुणापर्यंत सर्वच जण पतंग उडविण्याचा आनंद या निमित्ताने घेतात. याच पार्श्वभूमीवर शहरात विक्रेत्यांकडे वेगवेगळ्या प्रकारचे कागदी, कापडी त्यावर काढलेल्या अनोख्या चित्रांचे पतंग विक्रीसाठी आले आहेत. या पतंगांची खरेदी करण्यासाठी सर्वच वयोगटातील मुले प्राधान्य देत आहेत. तिळगूळाचा गोडवा आणि महिला वर्गाला लागलेली संक्रांतीची चाहूल सोबत तरुणाईमध्ये पतंग उडविण्याच्या अनोख्या स्पर्धेला आतापासूनच उधाण आले आहे.
पतंग प्रेमींना जानेवारी महिन्याची आणि मकर संक्रांतीची प्रतीक्षा असते. कारण, याच कालावधीत शहरातील विक्रेत्यांकडे विविध प्रकारचे पतंग दाखल होतात. परभणीतील गुलशनबागेजवळ विक्रेत्याकडे हे पतंग उपलब्ध आहेत. मागील आठ दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथून विविध प्रकारचे पतंग विक्रीसाठी आले आहेत. मागील अनेक वर्षांपासून शहरातील लहान मुले, तरुणाई विविध भागांमध्ये घरोघरी सोबत मैदानात पतंग उडविण्याचा आनंद घेतात. यामध्ये अनेक ठिकाणी पतंग काटाकाटीच्या स्पर्धा सुद्धा लावल्या जातात. संक्रांतीनिमित्त या पतंगबाजीला विशेष महत्त्व आहे. रंगीबेरंगी विविध प्रकारच्या कागदाच्या, कापडी पतंग सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये मागील काही वर्षांपासून पतंगासोबत असलेल्या नायलॉन मांजाच्या विक्रीला बंदी घालण्यात आल्यामुळे दोऱ्याची रील पतंगासोबत मिळत आहे. या पांढऱ्या दोऱ्याच्या सहायाने आकाशात हे पतंग सोडले जातात.
दहा हजार पतंगांची उपलब्धताशहरात एकमेव पतंग विक्रेते असलेल्या गुलशनबाग भागातील संबंधित विक्रेत्याकडे मागील आठ दिवसांपूर्वी दहा हजार पतंग विक्रीसाठी आले आहेत. अजून काही दिवसांमध्ये किमान दहा ते पंधरा हजार पतंगांची खरेदी-विक्री सुद्धा होते. त्यामुळे पतंगांना मोठ्या प्रमाणावर मागणी आली आहे.
किमान दोन रुपये ते ३० रुपयांपर्यंत पतंगलहान पतंग आणि सर्वात मोठा पतंग सोबतच वेगवेगळ्या आकाराचे सहा इंच ते चार फूट अशा प्रकारातील पतंग या ठिकाणी विक्रीस आले आहेत. किमान दोन रुपये ते जास्तीत जास्त ३० रुपयांपर्यंतचे पतंग आहेत. वीस रुपये, पंचवीस रुपयाला कागदी पतंग आहेत. लहान पतंग १५ रुपयांना तर मेनकापडाचे पतंग पाच रुपये, आठ रुपये, दहा रुपये या दराने विक्री होत आहेत.
चक्री दोनशेला तर दोरा ५० रुपयांनापतंगासाठी लागणारी दोऱ्यासोबतची चक्री ही दोनशे रुपयांना तर दोऱ्याचे बंडल ५० रुपयांना विक्री होत आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा भाव वाढले आहेत. त्यामुळे विविध प्रकारच्या पतंगांना लहान मुले, तरुणाई यांच्याकडून मागणी होत असल्याची माहिती विक्रेते अजमत उल्ला यांनी दिली.
हे आहेत विविध प्रकाररामपुरी, हॅपी न्यू इयर, आय लव माय इंडिया, फ्री फायर, मार्बल, कापडी, प्रिंटेड, येवला धोबी, प्रिंटेड, पारंपरिक कागदी, स्पायडरमॅन, कार्टून असे प्रकार उपलब्ध आहेत.
आनंद लुटा मात्र काळजी घेऊननायलॉन मांजाला बंदी आहे. मात्र, नायलॉन मांजाचा वापर होत नसला किंवा विक्री होत नसली तरी पतंग उडविताना घरातील छतावर, सोबतच मोकळ्या जागेत किंवा दुमजली इमारतीवर लहान मुलांनी किंवा त्यांच्यासोबत कोणीही नसताना पतंग उडविताना काळजी घेणे, आजूबाजूला बघणे गरजेचे आहे. लहान मुलांसोबत घरातील सदस्यांनी किंवा मोठ्यांनी उपस्थित राहून पतंग उडविण्याचा आनंद घ्यावा. परंतु, त्यातून कुठल्याही प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.