परभणी : तालुक्यातील माळसोन्ना गावामध्ये मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुरू असलेल्या सप्ताहामध्ये एकादशी असल्याने भाविकांना भगरीचे वाटप प्रसाद म्हणून करण्यात आले. ही भगर खाल्ल्यानंतर काही वेळाने अनेकांना उलटी, जुलाब, चक्कर येणे असे प्रकार सुरू झाले. पाहता पाहता हा त्रास अनेकांना होऊ लागला. त्यामूळे ग्रामस्थांनी तसेच भाविकांनी उपचारासाठी परभणी गाठली. रात्री अकरा वाजेपर्यंत कॅज्युलटीमध्ये रुग्णांची उपचारासाठी गर्दी सुरूच होती. साधारण शंभरहून अधिक जणांना ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आरोग्य यंत्रणेतील सूत्रांनी दिली.
परभणी तालुक्यातील ब्राह्मणगाव जवळ माळसोन्ना गाव आहे. या गावामध्ये सप्ताह सुरू आहे. या सप्ताहात मंगळवारी एकादशी असल्याने सायंकाळी साडेपाच वाजता कथा समाप्तीनंतर उपस्थित भाविकांना भगरीचे वाटप करण्यात आले. गावातील महिला, लहान मुले आणि भाविकांनी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान ही भगर खाल्ली. अनेकांना साडेसात ते आठच्या दरम्यान रात्री उलटी, जुलाब त्रास सुरू झाला. त्यानंतर ज्यांना त्रास होत आहे, असे रुग्ण थेट परभणीमध्ये दाखल झाले. यात जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण कक्षामध्ये अनेकांवर उपचार करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत रुग्ण दाखल होत होते.
रुग्णांच्या प्रकृती प्रमाणे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित करून उपचार केले जात होते. याशिवाय परभणी शहरातील काही खाजगी दवाखान्यात सुद्धा अनेक रुग्णांनी धाव घेतली. जिल्हा आरोग्य यंत्रणेतील शिवाय खाजगी रुग्णवाहिका या गावातील रुग्णांना आणण्यास माळसोन्ना येथे गेल्या होत्या. हा रुग्णांचा आकडा अंदाजे १०० हून अधिक असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. विशेष करून यामध्ये महिला, मुलांचा समावेश आहे. यात कोणीही गंभीर नाही, मात्र, रुग्ण संख्या वाढतच आहे. दरम्यान, मंगळवारी असाच एक प्रकार पालम तालुक्यातील तीन गावांमध्ये घडला, ज्यात सात जणांना भगरीतूनच विषबाधा झाली आहे.