मानवत (परभणी ) : येथील तहसील प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांची तलाठ्यामार्फत सुक्ष्म तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप हा अहवाल तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाला नसल्याने निराधारांचे अनुदान वाटप रखडले आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत निराधार घटकांसाठी संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मासिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना या दोन राज्य शासनाच्या तर इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना या योजनेचा समावेश आहे. यातील पात्र लाभार्थ्यांना दरमहा ६०० रुपयांचे मानधन दिले जाते. या योजनेसाठी तालुक्यातील निराधार लाभार्थ्यानी तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले होते. यातील १ हजार ८७ अर्ज निकाली काढण्यासाठी २७ आॅक्टोबर २०१७ रोजी बैठक घेण्यात आली होती.
बैठकीत तहसीलदार अश्विनी जाधव यांनी ३६६ अर्ज मंूजर केले होते. तर या बैठकीत ७१५ अर्ज नामंजूर करण्यात आले होते. बैठकीत मंजूर केलेल्या पात्र लाभार्थ्यांची सुक्ष्म तपासणी करण्याचे आदेश तहसीलदार जाधव यांनी २७ नोव्हेंबर रोजी दिले होते. तलाठ्यांमार्फत ही तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. लाभार्थी मयत झाला आहे का? मुले नोकरीला आहेत का? लाभार्थी स्थलांतरित आहे का? त्यांचा आर्थिक स्तर आदींची तपासणी करण्यात येणार होती. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी केवळ दहा गावांतील २५१ लाभार्थ्यांचे अहवाल कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. इतर लाभार्थ्यांचे अहवाल मात्र आले नाहीत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांचे याकडे लक्ष लागले आहे. उर्वरित गावातील अहवाल सादर करण्यास विलंब करणार्या तलाठ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निराधारांमधून केली जात आहे.
बोंडअळी सर्व्हेक्षणाचा अडथळामानवत तालुक्यातील ३६६ निराधार लाभार्थ्यांच्या सुक्ष्म तपासणीचे आदेश काढून तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. यामध्ये मानवत, रामेटाकळी, उक्कलगाव, केकरजवळा, सावळी, भोसा, वझूर, सावरगाव, पाळोदी, रुढी या १० गावातील २५१ लाभार्थ्यांचे तपासणी अहवाल तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. उर्वरित ४४ गावातील १०५ लाभार्थ्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. याच काळात बोंडअळीग्रस्त कापसाच्या सर्वेक्षणाचे कामही तलाठी कर्मचार्यांना करावे लागले. या सर्वेक्षणामुळेच अहवाल सादर करण्यास विलंब झाल्याचे कर्मचार्यांतून बोलल्या जात आहे. याचा त्रास मात्र निराधार लाभार्थ्यांना होत आहे.
तलाठ्यांना सूचना दिल्या आहेतमानवत येथील तहसील कार्यालयास तालुक्यातील काही निराधार लाभार्थ्यांचे सुक्ष्म तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. उर्वरित निराधार लाभार्थ्यांचे तपासणी अहवाल सादर करण्याच्या सूचना तलाठ्यांना दिल्या आहेत. - अश्विनी जाधव, तहसीलदार, मानवत