परभणी : येथील महानगरपालिकेत रोजंदारीवर काम करणाऱ्या ९२ कर्मचाऱ्यांना वर्ग ३ आणि वर्ग ४ पदांवर कायम करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, मनपाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार या कर्मचाऱ्यांचे आदेश १४ जानेवारी रोजी प्राप्त झाले. या आदेशांमुळे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील ११ मार्च १९९३ ते २७ मार्च २००० या कालावधित नियुक्त होऊन सध्या कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार परभणी महानगरपालिकेने २८ मार्च २०१८ रोजी ९२ कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव नगर विकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्यानुसार मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्रदीप पाटील यांनी १४ जानेवारी रोजी आदेश काढले आहेत. आयुक्त देविदास पवार यांनी या आदेशाची माहिती कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी जल्लोष साजरा केला.
लोकप्रतिनिधींनी केला पाठपुरावा
मनपातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे, यासाठी माजी मंत्री आ. सुरेश वरपूडकर, खा. बंडू जाधव, आ. डॉ. राहुल पाटील, महापौर अनिता रवींद्र सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, माजी महापौर मीनाताई वरपूडकर, आयुक्त देविदास पवार, सभागृह नेते माजू लाला, स्थायी समितीचे सभापती गुलमीर खान यांच्यासह कर्मचारी संघटनेचे के. के. आंधळे, आनंद मोरे, अनुसयाताई जोगदंड, के. के. भारसाखळे आदींनी पाठपुरावा केला होता.
यापूर्वी ३० कर्मचारी कायम
महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बिंदूनामावलीला २०१६ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांच्या कार्यकाळात ३० कर्मचारी सेवेत कायम झाले होते. आता आयुक्त देविदास पवार यांच्या कार्यकाळात ९२ कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यात आले आहे.