पालम ः सकल मराठा समाजास आरक्षण मागणीसह पालम तहसील कार्यालयसमोर सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंब्यासाठी आज शहरात जण आक्रोशमोर्चा काढण्यात आला. तसेच आज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
पाच दिवसांपासून बाजार समितीचे सभापती गजानन गणेशराव रोकडे, भारत हिलाल व विशाल रोकडे मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ आज मोर्चासाठी हजारो बांधव एकत्र आले. सकाळी सिरपूर, केरवाडी, कापसी, सायळा, खुर्लेवाडी, धनेवाडी येथून आलेले युवक पालम शहरातून रॅलीनंतर मोर्चास्थळी दाखल झाले. तदनंतर दुपारी 12 वाजता तहसिलसमोरून मोर्चाला सुरूवात झाली. तो ममता शाळा कॉर्नर, शनिवार बाजार, फळा रोड, पेठपिंपळगाव चौकमार्ग उपोषणस्थळी दाखल झाला. दरम्यान, मोर्चेक-यांच्या घोषणांनी शहर दणाणून निघाले.
जिल्हा बँकेचे संचालक गणेशराव रोकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वसंतराव सिरस्कर, काँग्रेसचे कृष्णा भोसले, भाजपचे शिवाजीराव दिवटे, संदिप माटेगावकर, प्रा. अनंतराव शिंदे, डॉ. अशोकराव जाधव, प्रभारी माधवराव गायकवाड, बळीराम चवरे, एड. पातळे, भय्यासाहेब सिरस्कर, काशिराम पौळ, मारोतराव पौळ, भगवान सिरस्कर, ओमकार सिरस्कर, श्री. आनेराव, गजानन महाराज दुधाटे, गजानन देशमुख, प्रकाश रोकडे, माऊली घोरपडे, नरसिंग रोकडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पदुदेवा जोशी यांनी केले. तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी उपोषणस्थळी येवून निवेदन स्विकारले. मोर्चासाठी डिवायएसपी बी.व्ही. गावडे, पोनि रावसाहेब गाडेवाड, सपोनि मारोती कारवार, फौजदार गणेश सवंडकर, डी.एस. जाधव, गुप्त शाखेचे बाबुराव बेद्रे यांच्यासह राखीव पोलिसांनी चौख बंदोबस्त ठेवला होता.