परभणी : मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. शहरात गटा-गटाने फिरुन बंदचे आवाहन करण्यात आले. परभणी शहरात काही दुकानांवर दगडफेकही झाली. परभणी रेल्वेस्थानकावर कार्यकर्त्यांनी अर्धा तास रेलरोको आंदोलन केले.
मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात तीव्र आंदोलन केले जात आहे. मंगळवारी महाराष्ट्र बंदीच हाक दिल्याने सकाळपासूनच जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. परभणी शहरात सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी गटा-गटाने फिरुन बाजारपेठ बंद केली. शिवाजी चौक, नानलपेठ, सुपर मार्केट, स्टेडियम कॉम्प्लेक्स आदी भागात दगडफेकीच्या घटना घडल्या. बंदच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने जिल्ह्यातील संपूर्ण बससेवा बंद ठेवली आहे़ त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत एकही बस शहरात आली नाही किंवा शहरातून बाहेर बस गेली नाही़ पाथरी येथेही सकाळपासून कडकडीट बंद पाळण्यात आला आहे़ पाथरी, सोनपेठ, सेलू, पूर्णा आदी ठिकाणी बाजारपेठामध्ये शुकशुकाट दिसत आहे़ सोनपेठ शहरात शिवाजी चौकात आंदोलकांनी अग्नीशमन दलाची गाडी फोडली़ तर पूर्णा शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले़ तसेच ठिक ठिकाणी टायर जाळून निदर्शने करण्यात आली़ दिवसभर शेकडो युवक रस्त्यावरून फिरत बंदचे आवाहन करीत होते़
परभणीत रेलरोको आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी परभणी रेल्वे स्थानकावर रेलरोको आंदोलन करण्यात आले़ शेकडो युवक आंदोलनस्थळी एकत्र आले होते़ यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली़ अर्धा ते पाऊण तास हे रेल्वे रोको आंदोलन झाले़ सचखंड एक्स्प्रेससह दोन पॅसेंजर गाड्या अडविण्यात आल्या होत्या.